लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी: वारकरी संप्रदायाच्या भावनेइतकाच संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर व्यवस्थापनाचा व कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊनच यंदा नियोजन करण्यात आले. दरवर्षी पालखी प्रस्थान सोहळ्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन सोहळ्याच्या सर्व संबंधितांशी सतत विचारविनिमय करून संस्थान कमिटीने यंदा दिंड्यांमधील वारकऱ्यांची संख्या मर्यादित करण्याचा प्रयोग केला. मुख्य म्हणजे फडकरी, दिंडीकरी व ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्याशी संबंधित सर्व घटकांनी याला सहकार्य केले. मात्र आळंदी मध्ये शिकणाऱ्या वारकरी विद्यार्थ्यांच्या ४०० जणांच्या गटाने प्रवेशासाठी प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी गोंधळ घातला. या गोंधळामुळेच माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला गालबोट लागले असा खुलासा आळंदी संस्थान कमिटीने केला आहे.

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने चार पानांचे लेखी पत्र देत प्रस्थानाच्या दिवशी काय घडले. त्यापूर्वी संस्थान कमिटीने व्यवस्थानासंदर्भात घेतलेले निर्णय याबाबत माहिती देत आपला खुलासा दिला आहे. संस्थान कमिटीने म्हटले आहे,प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी म्हणजे ११ जून २०२३ या दिवशी दुपारी श्रींचा नैवेद्य झाल्यानंतर संपूर्ण मंदिर रिकामे करण्यात आले. त्यानंतर दुपारी २.३० वाजल्यापासून परंपरेनुसार मंदिरात प्रवेश करणाऱ्या ४७ दिंड्या त्यांच्या ठरलेल्या मार्गाने मंदिर परिसरात येण्यास सुरूवात झाली. दिंडीतील वारकऱ्यांचे पासेस बघून त्यांना मंदिराकडे रवाना करण्याचे काम पोलिस करत होते. याच दरम्यान, मोठ्या संख्येने काही वारकरी विद्यार्थी जोगमहाराजांनी स्थापन केलेल्या वारकरी शिक्षण संस्थेची जुनी इमारत असलेल्या बोळात जमले असून आम्हांला प्रस्थानसाठी मंदिरात प्रवेश मिळावा’, अशी मागणी ते करत असल्याचे संस्थानचे विश्वस्त व सोहळाप्रमुख अॅड विकास ढगे-पाटील यांना संस्थानच्या कर्मचाऱ्याकडून कळले. विद्यार्थ्यांची ती संख्या ३०० ते ४०० इतकी असावी. संबंधित विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न बंदोबस्तावर असणारे पोलिस कर्मचारीही त्याचवेळी करत होते.

आणखी वाचा-वारकऱ्यांसाठीच्या पथकरमाफीचा गैरफायदा?

प्रस्थान सोहळ्यासाठी आवश्यक असणारा पास नसलेल्यांना मंदिरात प्रवेश देता येणार नाही, ही बाब पोलीस अधिकारी व कर्मचारी त्या विद्यार्थ्यांना स्पष्ट करत होते. परंतु, ‘मंदिरात दर गुरुवारी आयोजित करण्यात येणाऱ्या पालखीमध्ये आमचा नित्य सहभाग असतो, तसेच मंदिरात साजऱ्या होणाऱ्या सप्ताहामध्येदेखील आमची वर्षभर सेवा चालू असते. त्यामुळे पासेस जरी नसले तरी प्रस्थानसाठी मंदिरात प्रवेश मिळणे हा आमचा सेवेचा अधिकार होय त्यामुळे आम्हा सगळ्यांना मंदिरात प्रवेश मिळालाच पाहिजे’, असा जमलेल्या विद्यार्थ्यांचा आग्रह होता. संस्थान कमिटीचे विश्वस्त व सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे-पाटील यांनी मग मंदिरातून बाहेर येत पोलिसांकडे असलेल्या ध्वनिक्षेपक यंत्रणेद्वारे जमलेल्या विद्यार्थ्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. मात्र शांतपणे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत संबंधित विद्यार्थी नव्हते.

तिथे जमलेल्या सगळ्या म्हणजे सुमारे ३०० ते ४०० विद्यार्थ्यांना मंदिरामध्ये प्रस्थानसोहळ्यासाठी प्रवेश मिळालाच पाहिजे, असा विद्यार्थ्याचा पवित्रा कायम होता. गोंधळ करणाऱ्या विद्यार्थ्यांना संयम व सहकार्याचे आवाहन करून सोहळाप्रमुख पुन्हा मंदिरात परतले. चोपदार राजाभाऊ चोपदार यांनीदेखील विद्यार्थ्यांच्या समजावले पण ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत विद्यार्थी नव्हते. सोहळाप्रमुख मंदिराकडे परतल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांनी पोलिसांचे कडे भेदून मंदिराकडे धाव घेतली. मंदिराकडे नियंत्रित प्रवेश देण्याच्या हेतूने उभे केलेले बॅरिकेड्स बळाने दूर करून प्रस्थानसाठी मंदिराकडे धाव घेणा-या वारकरी विद्यार्थ्यांना आवरण्याकरता त्या वेळी बंदोबस्तासाठी तिथे उभ्या असणाऱ्या पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपाची भूमिका घ्यावी लागली. हा प्रसंग सगळ्यांच्याच दृष्टीने अतिशय खेदकारक व अनुचित होता. थोडे सामंजस्य दाखवल्याने तो टाळताही आला असता.

आणखी वाचा-पंतप्रधान इंग्रजीपासून देशाची सुटका करत आहेत- दीपक केसरकर

सेवा आणि शिस्त, भावना आणि सारासार विचार यांचे संतुलन येत्या काळात सर्वांनाच पाळावे लागणार आहे. तेव्हा, प्रस्थान सोहळ्यासाठी यंदा मंदिरात प्रवेश देण्याबाबत मार्गदर्शक तत्वे सर्व संबंधितांशी चर्चामसलत करून निश्चित करण्यामागे संस्थान कमिटीचा कोणताही स्वार्थ नाही. अथवा, कोणालाही ज्ञानोबारायांच्या सेवेपासून वंचित करावे, भेदभाव करावा, असा हेतू अजिबातच नाही आणि केव्हाच नव्हता. दिंड्यांमधील वारक-यांसह मंदिरात जमणा-या भाविकांची सुरक्षा, संप्रदायाची प्रतिमा आणि व्यापक सामाजिक सलोखा व हित यांचा विचार या सगळ्यांत मुख्य होता. वारकरी विद्यार्थ्यासह सर्वच संबंधितांनी या सगळ्याचा विचार करत कोणताही किंतु मनात न ठेवता संस्थान कमिटीस यापुढेही सहकार्य करावे असे आवाहन कमिटीने केले