पुण्यातील खडकी पोलिस स्टेशनमधील कर्मचारी समाधान कोळी आणि संजोग शिंदे हे काल रात्री गस्तीवर असताना दुचाकीवरून जाताना चार चाकी वाहनाने दिलेल्या धडकेत समाधान कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. तर संजोग शिंदे हे गंभीर झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. तर या प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
हेही वाचा : एमपीएससी परीक्षेला अतिवृष्टीचा फटका… पण लगेचच उपाययोजना!
या घटनेपूर्वी खडकी पोलिस स्टेशनमधील समाधान कोळी आणि संजोग शिंदे हे गस्तीवर होते. त्यावेळी खडकी भागातील बस स्टॉपवर ११ वर्षांची मुलगी आढळून आली. त्या मुलीकडे दोघांनी विचारपूस केली आणि आई वडिलांचा नंबर घेतला. तुमची मुलगी आढळून आली असून घरचा पत्ता विचारल्यावर, ती पिंपळे सौदागर भागात रहात असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर या दोघांनी मुलीच्या आई वडिलांना बोलावून खातरजमा करून मुलीला आई वडीलांच्या ताब्यात दिले. या मुलीबाबत पोलीस कॉन्स्टेबल समाधान कोळी आणि संजोग शिंदे यांनी पोलिसांच्या ग्रुपवर फोटो पोस्ट केला. त्यानंतर दोघे खडकी बाजार भागातून बोपोडीच्या दिशेने दुचाकीवरून जाऊ लागले. त्यावेळी भरधाव चार चाकी वाहनांने दुचाकीला जोरात धडक दिली. त्या अपघातामध्ये समाधान कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. तर संजोग शिंदे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर या घटनेमुळे पोलिस दलात शोककळा पसरली आहे.