पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यात बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या तब्बल ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचं हस्ताक्षर असल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे रज्यभरात खळबळ उडाली होती. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या निकालाचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने आज बारावीचा निकाल जाहीर केला. निकालाच्या पत्रकार परिषदेवेळी राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचं हस्ताक्षर असणे आणि त्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिलं. शिक्षण मंडळाकडून नेमण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये ओव्हररायटिंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. नेमक्या कोणत्या टप्प्यावर हा प्रकार झाला याचा अभ्यास करण्यात येत आहे. त्याशिवाय या प्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा >>>Maharashtra HSC Result 2023 पुणे: निकाल घटला, गुणवंतही घटले
या प्रकरणात थेट विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे ३७२ विद्यार्थ्यांचा निकालही जाहीर करण्यात आला असून, ओव्हररायटिंग केलेला भाग वगळून उत्तरपत्रिकेतील गुणांचे मूल्यांकन करण्यात आल्याचं गोसावी यांनी स्पष्ट केलं.