माहिती तंत्रज्ञानाच्या युगात भारतानेही एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, ही ओळख पुसली जाते की काय? अशी भीती पिंपरी चिंचवडमधील अभियंता निनाद पाटीलच्या आत्महत्येच्या घटनेनंतर डोकेवर काढताना दिसते. पिंपरी-चिंचवडच्या रहाटणीमधील वर्धमान सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून, इन्फोसिस कंपनीत काम करणाऱ्या अभियंता निनाद पाटील याने आत्महत्या केली होती. हा निर्णय स्वत: घेतला असून आई-वडिलांना कोणीही त्रास देऊ नये, अशा आशयाची सुसाईड नोट ही त्याने लिहून ठेवली होती. यावरून घरगुती कारणातून निनादने हे टोकाचे पाऊल उचलले नसणार हे स्पष्ट होत आहे. त्यामुळं कंपनीच्या ताणतणावातून ही आत्महत्या झाली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पिंपरी-चिंचवडमधील आत्महत्येच्या घटना-
पिंपरी चिंचवडमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. २ एप्रिल २०१७ रोजी जीशन शेख या पिंपळे गुरवमध्ये राहणाऱ्या अभियंत्याने ११ व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली होती. १७ मार्च २०१७ ला दिघी येथील राजू तिवारी या अभियंत्याने पत्नीसह विष प्राशन करुन आयुष्य संपवले होते. तर ३ फेब्रुवारी २०१७ रोजी अभिषेक यादव या अभियंत्याने हिंजवडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले होते. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असताना आत्महत्या करणारा निनाद हा काय पहिलाच अभियंता नाही. तर पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात राहणाऱ्या दहापेक्षाही अधिक अभियंत्यांनी गेल्या वर्षभरात आयुष्य संपवले आहे. हे टोकाचे पाऊल उचलण्यामागची बरीचशी कारण ही कंपनीच्या धोरणाशी निगडित असल्याची चर्चा रंगताना दिसते. यासोबतच अभियंत्यांची व्यसनाधीनता ही याला कारणीभूत आहे.
अभियांत्रिकीचं शिक्षण घेणारे विद्यार्थी हे भारतासह विविध देशात माहिती तंत्रज्ञानात ठसा उमटवत आहेत. त्यामुळेच हे क्षेत्र देशात भारताचा आलेख हा कायमच चढता ठेवण्यात यशस्वी राहिला. मात्र, हे अभियंते नव्यानं जे अत्याधुनिक यंत्र बनवतायेत तेच यंत्र त्यांच्या जीवावर उठू लागले आहे. कारण हे अत्याधुनिक यंत्र कर्मचाऱ्यांची गरज कमी भासवू लागले आहे. परिणामी कंपन्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत आहेत. मात्र, असे असले तरी यातून खचून न जाता कर्मचाऱ्यांनी सावरणं गरजेचं असल्याचे आवाहन या क्षेत्रातील जाणकारांनी केले आहे.
कंपनीच्या धोरणासोबतच ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकासारख्या देशांनी भारतीयांच्या व्हिसावर आणलेली निर्बंध ही याला कारणीभूत ठरत आहे. हे निर्बंध परदेशातील अभियंत्यांना पुन्हा मायदेशी परतायला लावणारे आहेत. याचा परिणाम इतर देशातील भारतात असणाऱ्या कंपन्यांवर ही होत आहे. परिणामी आत्महत्यांच्या घटना आणखी डोकं वर काढू लागल्या आहेत.