पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी (१० ऑक्टोबर) घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेला (टीईटी) राज्यातील ९३ टक्के उपस्थिती होती. या परीक्षेदरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यात आल्याने गैरप्रकार रोखले गेले असले, तरी हलगर्जीपणा केलेल्या कर्मचारी, अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य परीक्षा परीषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी स्पष्ट केले आहे.

टीईटी परीक्षेसाठी राज्यातील एकूण ३ लाख ५३ हजार ९५२ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यात पेपर एकसाठी १ लाख ५२ हजार ६०५ उमेदवारांनी, तर पेपर दोनसाठी २ लाख १ हजार ३४७ उमेदवारांचा समावेश होता. राज्यभरातील एकूण १ हजार २३ केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. पहिल्या पेपरला ९२.२२ टक्के, तर दुसर्‍या पेपरला ९२.९२ टक्के उमेदवारांनी उपस्थित होते. तीन वर्षांनंतर राज्यात टीईटी परीक्षा घेण्यात आली.

हेही वाचा – ‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान

टीईटी परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी यंदा प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाद्वारे प्रत्येक परीक्षा केंद्रांवर देखरेख ठेवण्यात आली. परीक्षा केंद्रात जाताना प्रत्येक उमेदवाराचे फेस रिडिंग, बायोमेट्रिक, मेटल डिटेक्टरचा वापर करण्यात आला. प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरा बसवल्याने परीक्षेवर लक्ष ठेवता आले. परीक्षा केंद्रावर उमेदवार, अधिकारी, कर्मचार्‍यांची मेटल डिटेक्टकरद्वारे तपासणी करण्यात आली. त्यामुळे उमेदवारांना कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण परीक्षा केंद्रावर नेता आले नाही. एआयद्वारे परीक्षा केंद्रावरील उमेदवार, अधिकारी, कर्मचारी यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आले होते. काही केंद्रावर काही विचित्र प्रकार आढळले असता परीक्षा परिषदेच्या अधिकार्‍यांनी संबंधित केंद्रसंचालकांना कामकाजात सुधारणा करण्याबाबतचे आदेशही बजाविले.

हेही वाचा – पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बायोमेट्रिक, फेस रिडिंगमुळे तोतया किंवा बोगस उमेदवार रोखले गेले. एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टीईटी परीक्षेवर देखरेख केल्यामुळे काही अधिकारी, कर्मचारी यांनी कामात कचुराई केल्याचे निदर्शनास आले आहे. नांदेड, औरंगाबाद, बीड जिल्ह्यांसह अन्य काही ठिकाणी परीक्षा केंद्रातील उमेदवार परीक्षा काळात मागे-पुढे पाहत असल्याचे, एकमेकांशी बोलताना दिसून आले. याबाबत संबंधित शिक्षणाधिकारी यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. बेडसे यांनी दिली.