पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात लोकमान्य टिळक स्मारक समिती तर्फे देण्यात येणारा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर झाला. याच पुरस्कार सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले आहेत. पुण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. तिथे अभिषेकही केला. आपण जाणून घेणार आहोत या गणपतीचं नेमकं महत्त्व काय?
श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे १८ व्या शतकातले पुण्यातले सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. पुण्यातल्या बुधवार पेठ भागात असलेलं दत्त मंदिर भागात त्यांचं वास्तव्य होतं. प्लेगच्या साथीत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचं निधन झालं. या घटनेमुळे दगडूशेठ हलवाई आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई दोघेही दुःखी झाले. त्यावेळी माधवनाथ नावाचे महाराज होते त्यांनी या दोघांचं सांत्वन केलं आणि त्यांना सांगितलं की आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा आणि त्याची रोज पूजा करा. त्यानंतर तयार झाली ती दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली.
हे पण वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन, कसा आहे पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा?
१८९४ मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली. १८९६ मध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली आणि तिचा उत्सव सुरु झाला. नंतरच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचं निधन झालं. मात्र त्यांनी सुरु केलेली गणेश उत्सवाची परंपरा कायम राहिला.
१८९६ मध्ये तयार करण्यात आलेल्या मूर्तीची अवस्था ही कालांतराने जीर्ण झाली. त्यानंतर १९६७ मध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीच्या उत्सवाच्या अमृत महोत्सनिमित्त सुवर्णयुग तरुण मंडाळाच्या प्रताप गोडसेंनी आणि इतर सदस्यांनी गणपतीची नवी मूर्ती तयार करण्याचा संकल्प केला. कर्नाटकच्या मूर्तीकारांकडून ही मूर्ती तयार करण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे देश-विदेशातल्या भाविकांचं श्रद्धास्थान आहे. पुण्यातल्या मानाच्या गणपतींच्या बरोबरीने या गणपतीचं स्थान आहे.