पुणे: शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. जुलै महिन्यात शहरात डेंग्यूचे ९२ संशयित रुग्ण सापडले आहेत. यामुळे आरोग्यतज्ज्ञांनी डेंग्यूपासून बचाव करण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. याचबरोबर डेंग्यूचा संसर्ग झाल्यास कोणती काळजी घ्यावी, यावरही त्यांनी भर दिला आहे.
पुणे महापालिका हद्दीत जुलैमध्ये डेंग्यूचे ९२ संशयित रुग्ण आढळले. त्यातील १२ जणांना डेंग्यूचे निदान झाले आहे. शहरातील रुग्णसंख्या या महिन्याच्या सुरूवातीपासून वेगाने वाढू लागली आहे. यामुळे आरोग्यतज्ज्ञांकडून नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, जगभरात दरवर्षी सुमारे १० ते ४० कोटी नागरिकांना डेंग्यूचा संसर्ग होतो. प्रामुख्याने उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात डेंग्यूचा संसर्ग आढळतो.
डेंग्यूची लक्षणे कोणती?
बहुतांश जणांना डेंग्यूचा संसर्ग होऊनही सौम्य लक्षणे अथवा अजिबात लक्षणे दिसून येत नाही. संसर्ग झाल्यानंतर ती ४ ते १० दिवसांत लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे २ ते ७ दिवस राहतात. प्रमुख लक्षणांमध्ये उच्च ताप (१०४ फॅरनहिट), तीव्र डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, स्नायू व सांधेदुखी, चक्कर, मळमळ, ग्रंथींना सूज, त्वचेवर चट्टे यांचा समावेश आहे.
प्रतिबंध कसा करावा?
- डेंग्यूचा डास दिवसा सक्रिय असल्याने दिवसभर काळजी घ्यावी.
- शरीर पूर्णपणे झाकले जाईल असे कपडे परिधान करावेत.
- तुमच्या परिसरात डासप्रतिबंधक औषधांचा वापर करावा.
- डास घरात येऊ नयेत यासाठी खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात.
डेंग्यू झाल्यास काय करावे?
- पुरेशी विश्रांती घ्यावी.
- भरपूर द्रवपदार्थ प्यावेत.
- अंगदुखीसाठी पॅरासिटॅमॉलच्या गोळ्या घ्याव्यात.
- वेदनाशामक गोळ्या घेणे टाळावे.
- तीव्र लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांकडे जा.
शहरात डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी औषध फवारणी केली जात आहे. क्षेत्रिय कार्यालयांच्या पातळीवर डासोत्पती ठिकाणे शोधून नष्ट केली जात आहेत. डेंग्यू रुग्णांच्या उपचारासाठी नायडू रुग्णालय आणि कमला नेहरू रूग्णालयातील वॉर्ड सज्ज ठेवण्यात आले आहेत. – डॉ. भगवान पवार, आरोग्य प्रमुख, महापालिका