पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकत्र येणे शक्य नाही, असे विधान अजित पवार यांनी शिरूर येथे सोमवारी केले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नसल्याचा दावा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबियात कोणतीही फूट नाही. कोणी कसे वागायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. सार्वजनिक आयुष्य आणि खासगी आयुष्य वेगवेगळे असते,’ असे सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा – पाण्याच्या थकीत देयकांवर एप्रिलपासून एक टक्का दंड आकारणी, पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा निर्णय

शिरूर लोकसभा मतदारसंघातील एका कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीसंदर्भात अजित पवार यांनी भाष्य केले होते. पक्षात फूट पडलेली नाही. काही दिवसांनी सर्व एकत्र येतील, असे लोकांना वाटत आहे. मात्र, तशी परिस्थिती आता नाही, असे पवार यांनी सांगितले होते. यासंदर्भात पुणे दौऱ्यावर आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी हा दावा केला.

माझा लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे. सर्व पक्षांतील नेते, कार्यकर्त्यांबरोबर माझे संबंध सलोख्याचे आहेत. आमच्यातील मतभेद राजकीय आणि वैचारिक असून, कुणाशीही मनभेद नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही. तसेच पवार कुटुंबियांतही फूट नाही. खासगी आयुष्य जगण्याचा कुटुंबातील प्रत्येक सदस्याला अधिकार आहे, असे सुळे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – पिंपरी : ‘त्या’ उपनिरीक्षकाच्या मोटारीतून दोन किलो मेफेड्रोन जप्त

हर्षवर्धन पाटील यांना सुरक्षा पुरवावी

भाजपचे इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी धमकी मिळत असल्यासंदर्भात उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. यासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाटील कुटुंबियांबरोबर स्नेहाचे संबंध आहेत. पाटील यांना धमक्या येत असतील तर गृहमंत्र्यांनी त्यांना तातडीने सुरक्षा पुरविली पाहिजे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What supriya sule said about pawar family and ncp party pune print news apk 13 ssb
Show comments