पुणे: मागील वर्षभरापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या माध्यमांमधून संघर्ष उभारला. तर आता मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केले आहे.त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून दोन्ही समाजातील नेतेमंडळी आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे.या सर्व घडामोडी दरम्यान राज्याचे ग्रामविकासमंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन हे पुणे दौर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांनी अनेक राजकीय घडामोडी बाबत भूमिका देखील मांडली.

मागील वर्षभरात मनोज जरांगे पाटील यांचं अनेक वेळा उपोषण आणि आंदोलन झालं. त्यामध्ये ठोस निर्णय घेण्यात सरकार अपयशी ठरले का ? त्या प्रश्नावर गिरीश महाजन म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने आजपर्यंत जे काही करायच होतं. त्याबाबत सर्वकाही केलं आहे. मराठा समाजाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले होते. तसेच मराठा आरक्षणाच्या बाबतीत ५० वर्षांत कोणी प्रयत्न केले का ? शरद पवार म्हणाले होते की, मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरजच काय, हे शरद पवार यांचं विधान आहे, अशा शब्दांत शरद पवार यांना टोला लगावला.

हेही वाचा : पुण्यात ‘या’ कारणामुळे कडाडले कोथिंबिरीचे भाव; बाजार समितीने उगारला कारवाईचा बडगा

तसेच ते पुढे म्हणाले की, आम्ही मराठा समजाच्या बाजूने आहोत, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. पण जरांगे पाटलांचं समाधान होतच नसेल तर आता आम्ही काय करणार, सगे सोयरे यांना पण द्या,पण ते न्यायालयामध्ये टिकणारच नाही. तसेच माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारे आरक्षण देता येत नाही. पण त्यामध्ये काही करता येत असेल तर सरकार निश्चित प्रयत्न करेल अशी भूमिका त्यांनी मांडली.

हेही वाचा : सावधान! चहातून गुंगीचे औषध देऊन महिलांचे दागिने लुबाडतेय एक महिला

मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजात भाजपने वाद लावला अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यावर गिरीश महाजन म्हणाले की, आता जो तो त्याची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ही आंदोलन कशा प्रकारे उभी राहिली आहेत. याबाबत सुप्रिया सुळे यांना देखील माहिती आहे. मला सध्याच्या परिस्थिती बाबत सांगावं वाटतं की,दोन समाजात द्वेष, दुही निर्माण होईल, अशा प्रकारची विधान करू नये अशी भूमिका मांडत सुप्रिया सुळे यांना त्यांनी सल्ला दिला.