शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करुनही अपेक्षित सुधारणा न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी महापालिकेत घंटानाद आंदोलन केले. तसेच, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या ‘व्हॉटस्अप’वर शहराच्या विविध भागातील कचऱ्याच्या ढिगाचे फोटो पाठवले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्या संकल्पनेतून हे अभिनव आंदोलन करण्यात आले. पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, तसेच महापालिकेतील सभागृहनेता शंकर केमसे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. पक्षातर्फे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनाला येताना कार्यकर्त्यांनी त्यांच्या भागातील कचऱ्याची मोबाईलमध्ये काढलेली छायाचित्रे आणावीत, तसेच ही छायाचित्रे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना व्हॉटस्अपवर पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले होते. शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर झाली असून लवकरात लवकर हा प्रश्न सुटला पाहिजे, अशी मागणी करणारे निवेदन या वेळी देण्यात आले.
साठलेल्या कचऱ्याचा नागरिकांना त्रास होत असून राष्ट्रवादी काँग्रेस या प्रश्नावर सातत्याने सतत आवाज उठवत आहे. तसेच बठका घेऊन अधिकाऱ्यांचेही लक्ष वेधले गेले होते. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असली तरी हा प्रश्न सोडवण्यासाठी पक्षातर्फे आंदोलने केली जात आहेत. तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकत्रे शहर स्वच्छ व सुंदर राहील यासाठी सतत आग्रही आहेत. या आंदोलनांनंतर शहरातील वाढत्या कचऱ्याच्या प्रश्नासंदर्भात प्रशासनाने दखल घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. तरीही परिस्थितीत सुधारणा झालेली नसल्यामुळे राष्ट्रवादीला आंदोलन करावे लागले, असे वंदना चव्हाण यांनी या वेळी सांगितले.
रस्ते रोज झाडले जात असले तरी कचऱ्याचे वर्गीकरण व्यवस्थितरीत्या होत नाही. कंटेनरमुक्त प्रभाग करताना वर्गीकृत कचरा घराघरातून उचलला जावा. तसेच त्या प्रक्रियेची देखरेख व्हावी, अशीही मागणी राष्ट्रवादीने केली आहे. स्वच्छ, जनवाणी या संस्था कचऱ्याची समस्मा सोडवण्यासाठी महापालिकेबरोर काम करत आहेत. अशा संस्थांबरोबर योग्य तो समन्वय साधला जावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. घनकचरा विभागाला पुरेशी वाहने, तसेच कर्मचारी आहेत का हे पहावे, तसेच कचरा उचलण्याचे नियोजन योग्यरीतीने करावे, अशाही सूचना पक्षाने केल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा