त्या ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर सारखं काय असतं रे.. या व्हॉटस्अ‍ॅपनं मुलं पार बिघडवली.. आताची युवा पिढी सोशल नेटवर्किंगमध्येच गुरफटलेली असते.. अशा असंख्य तक्रारी करणाऱ्या मागच्या पिढीतील मंडळींना आता व्हॉटस्अ‍ॅपची मदत होणार आहे. ही मदत असेल, त्यांच्या मुलामुलींची लग्नं जुळवण्यासाठी! या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेतला, तर प्रत्यक्ष वधु-वरांसाठी उंबरे झिजवण्याऐवजी घरबसल्या माहिती घेता येणार आहे व संवादही साधता येणार आहे.. कारण पुण्यातील एका समजाच्या संघटनेने लग्नाच्या रेशीमगाठी जुळवण्यासाठी या अ‍ॅपचा उपयोग करून घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी खास ‘वधू-वर व्हॉटसअ‍ॅप ग्रुप’ही तयार केला आहे.
शिंपी इम्पॅक्ट ऑर्गनायझेशन या संघटनेने ‘शिंपी वधू-वर’ या नावाने व्हॉटसअ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. या सेवेचे उद्घाटन १ मे रोजी केले जाणार आहे. या अ‍ॅपमुळे दूरदूरच्या वधू, वरांना सहभागी करून घेणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजराथ, दिल्ली या राज्यांमधीलही वधू-वरही या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकले आहेत. यासाठी आतापर्यंत १ हजार ५०० तरुण-तरुणींनी नावनोंदणी केली आहे, अशी माहिती या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तमराव मांढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यासाठी शंभर जणांचा एक या प्रमाणे विविध ग्रुप तयार करण्यात आले आहेत. शंभरचा एक ग्रुप ‘वधू’ आणि दुसरा ग्रुप ‘वरा’चा असणार आहे. यामुळे ग्रुपवर वधू-वराची पूर्ण माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे लग्नाच्या पहिल्या टप्प्यातील बऱ्याचशा घडामोडी व्हॉटसअ‍ॅपवर होणार आहेत. त्याचप्रमाणे यामुळे वधू-वरांच्या पालकांचा पैसाही आणि वेळही वाचणार आहे, असेही मांढरे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा