पोलीस म्हणजे जगाच्या मागे असलेले. आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंध नसलेले. जगातील बदल खूप उशिरा स्वीकारणारे. अशी भावना असली तरी माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत ते खरे राहिलेले नाही. कारण माहिती देण्या-घेण्याचे अतिजलद साधन म्हणून अलीकडे नावारुपाला आलल्या ‘व्हॉट्स अॅप’ ने पुणे पोलिसांनाही भलतीच भुरळ घातली आहे. इतकेच नव्हे तर या तंत्राचा पोलिसांकडून जास्तीत जास्त वापर व्हावा म्हणून पुणे ग्रामीण पोलीस दलाने या ‘अॅप’चा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी मार्गदर्शन सुरू केले आहे.. आता पुणे ग्रामीण पोलीस दलात पन्नास टक्के पोलीस याचा वापर करत आहेत. हा आकडा शंभर टक्क्य़ांवर गेला, तरी आश्चर्य वाटून घेऊ नका.
मोबाईल व त्यावरील विविध ‘अॅप’च्या वापरामुळे जग वेगवान झाले आहे. माहितीची देवाण-घेवाण झटपट होऊ लागली आहे. ‘व्हॉट्स अॅप’ तर याचा कळसच! ते सध्या सोईचे, स्वस्त व अतिजलद संपर्काचे साधन म्हणून ते पुढे आले आहे. त्यामुळे एकूणच या अॅपचा वापर वाढला आहे. विशेष म्हणजे तंत्रज्ञानाच्या वापरात फारसा उत्साही नसलेला वर्ग म्हणजे पोलीस दलालाही या तंत्रज्ञानाने भुरळ घातली आहे. त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन पोलीस दलानेही या अॅपचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पुणे जिल्ह्य़ातील जास्तीत जास्त पोलीस जवानांना ‘व्हॉट्स अॅप’ वापरासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून माहितीची देवाण-घेवाण कशी करायची, याबाबत शिक्षण दिले जात आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची हद्द बरीच मोठी आहे. त्यामुळे एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत प्रत्यक्ष पोचण्यासाठी काही तास लागतात. मात्र, माहिती पोहोचवण्यासाठी ‘व्हॉट्स अॅप’चा मोठा फायदा होत आहे.
याबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी सांगितले की, व्हॉट्स अॅप हे माहिती जलद पाठवण्याचे व मिळविण्याचे चांगले साधन झाले आहे. पुणे ग्रामीणमध्ये सध्या पन्नास टक्के पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या अॅपचा वापर करत आहेत. एखादी दुर्घटना घडल्यानंतर जो पोलीस कर्मचारी घटनास्थळी लगेच पोहोचेल, तो त्या घटनास्थळाचे विविध बाजूने फोटो काढतो. हे फोटो त्या विभागाचे पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक यांना पाठवतो. त्यामुळे पोलीस अधीक्षकापर्यंत तातडीने सर्व माहिती पोहोचते. त्यामुळे त्या ठिकाणी पोहोचण्याच्या आधीच घटनास्थळाची नेमकी परिस्थती लक्षात येते. परिणामी, पुढील कारवाईच्या संबंधी तातडीने सूचनाही देता येतात. बहुतांश पोलीस अधिकारी ‘वॉट्स अॅप’ चा वापर करत आहेत. कर्मचाऱ्यांना हे कसे वापरावे याची माहिती दिली जात आहे.
पोलिसांचाही ग्रुप
पुणे ग्रामीणच्या पोलीस नियंत्रण कक्षात जिल्ह्य़ातील पोलीस निरीक्षकांपासून ते पोलीस अधीक्षकांचा एक ‘व्हॉट्स अॅप’ चा ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये पोलीस निरीक्षक, पोलीस उपअधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक यांचा समावेश आहे. एखादा संदेश द्यायचा असेल तर तो या ग्रुपवर अगोदर टाकला जातो. त्यानंतर सर्व पोलीस ठाण्याला वायरलेस मार्फतही दिला जातो. पण, व्हॉट्स अॅप वरून एकाच वेळी सर्व पोलीस अधीकाऱ्यांना तत्काळ एखादा संदेश दिल्यामुळे तातडीने त्यावर कारवाईला सुरुवात झालेली असते, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा