ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रे आता ‘व्हॉट्स अॅप’वर येणार आहेत! एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्राने किंवा उपकेंद्राने राबवलेली नावीन्यपूर्ण कल्पना इतर आरोग्य केंद्रांपर्यंत तत्काळ पोहोचावी आणि त्यांनीही त्यात सहभागी व्हावे यासाठी ‘व्हॉट्स अॅप’चा वापर केला जाणार आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूप पालटण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या ‘कायापालट’ अभियानाच्या मसुद्यात या केंद्रांसाठी ‘व्हॉट्स अॅप’चा वापर करणे प्रस्तावित आहे. आरोग्य केंद्रे स्वच्छ व सुशोभित करणे, त्या ठिकाणी मिळणाऱ्या वैद्यकीय सेवेची गुणवत्ता सुधारणे आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. या अभियानाचा मसुदा तयार करण्यात आला असून त्यातील तरतुदी निश्चित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. हे अभियान राबवत असताना एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्राने किंवा उपकेंद्राने कोणतीही नवीन कल्पना अमलात आणली की ‘व्हॉट्स अॅप’वरून इतरही केंद्रांना त्यात लगेच सहभागी होता यावे, अशी योजना आहे.
पुणे, सोलापूर आणि सातारा या विभागात हे अभियान तीन टप्प्यात राबवले जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. एच. एच. चव्हाण यांनी दिली. डॉ. चव्हाण म्हणाले, ‘‘पुण्याचे जिल्हा रुग्णालय तसेच बारामती, मंचर, पंढरपूर आणि कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात कायापालट अभियानाचा पहिला टप्पा राबवला जाईल. दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातील एक ग्रामीण रुग्णालय आणि एक प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश असेल. तर उरलेली ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे तिसऱ्या टप्प्यात सहभागी होतील.’’
जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकाऱ्यांचे मूल्यमापन होणार
‘कायापालट’ अभियानाअंतर्गत सर्व जिल्ह्य़ांचे जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कामगिरीचे दरमहा मूल्यमापन होणार असल्याचे डॉ. एच. एच. चव्हाण यांनी सांगितले. या अभियानाच्या मसुद्यात जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रगतिपुस्तकच तयार करण्याची तरतूद नमूद करण्यात आली आहे. या प्रगतिपुस्तकात जिल्ह्य़ातील आरोग्य संस्थांचा विकास हा प्रमुख निकष (इंडिकेटर) असणार आहे. अधिकाऱ्यांनी त्यांच्या अखत्यारीतील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे स्वच्छ, सुंदर व लोकाभिमुख करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेऊन त्यांना गुण दिले जाणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा