औंध रस्त्यावरील पाटील-पडळवस्तीजवळील प्रकार
शिधापत्रिकेवर देण्यात येणाऱ्या व चांगल्या स्थितीत असलेल्या धान्याची सुमारे शंभर पोती औंध रस्त्यावरील पाटील-पडळ वस्ती येथील दगडखाणीत आढळून आली. ही पोती कुणी व का टाकली याबाबत अन्नधान्य वितरण विभागाकडून तपास करण्यात येत असून, याबाबत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. धान्याचा काळाबाजार लपविण्यासाठी हा प्रकार करण्यात आला असावा, असा संशय या प्रकरणात व्यक्त होत आहे.
दगडखाणीमध्ये मोठय़ा प्रमाणावर गहू व तांदळाची पोती टाकण्यात आल्याचा प्रकार शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास स्थानिक नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी ही माहिती भीमशाही संघटनेचे अध्यक्ष राम पालखे यांनी दिली. पालखे व नागरिकांनी सकाळी या भागात पाहणी केली. खाणीत पोटी टाकल्याने अनेक पोती फुटली होती व तांदूळ व गहू एकत्र झाला होता.
या पोत्यांवर शासकीय शिक्केही दिसून आले. चांगल्या अवस्थेत असलेली अनेक पोती काही नागरिकांनी घरी नेली. मातीत मिसळलेल्या चांगल्या धान्याबाबत नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अन्नधान्य वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. खाणीत टाकलेल्या धान्याच्या पोत्यांमध्ये काही शासकीय, तर काही खासगी धान्य होते. या प्रकरणाचा तपास करण्यात येत असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे अन्नधान्य वितरण विभागाकडून सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा