लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पाच महिन्यांपूर्वी पुराचा फटका बसलेल्या आणि पावसाळ्यात खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर पुराचे पाणी घुसणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी पुणे महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. दरवर्षी पावसाळ्यात धरणातून पाणी सोडल्यानंतर या भागात पूर स्थिती निर्माण होऊन त्याचा त्रास स्थानिक रहिवाशांना होतो. ही बाब लक्षात घेत या भागातील रहिवाशांचे स्थलांतर केले जाणार आहे. लवकरच या परिसरात असलेल्या इमारतीमधील रहिवाशांचे स्थलांतर करून सामूहिक पुनर्विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) केला जाणार आहे.

यासाठी महापालिका प्रशासनाने याच भागात असलेली नियोजित पोलिस स्टेशनच्या मागील एक जागा निश्चित देखील केली आहे. त्यासाठीची आवश्यक ती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पुढील काही दिवसांत हे काम मार्गी लागणार असल्याने येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आणखी वाचा-आयटी हब हिंजवडीत दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद; 10 दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त, कमी किमतीत दुचाकी विकत असे

जुलै महिन्यात शहर आणि धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसानंतर सिंहगड रोडवरील एकतानगरी आणि आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. त्याचवेळी धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आले होते. या भागातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय मंडळींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी या भागातील नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

या भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा अभ्यास करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी एक समिती नेमली होती. या समितीच्या अहवालावर महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी घेतलेल्या बैठकीत चर्चा झाली. यामध्ये भविष्यातील पूरस्थिती रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये धरणातून पाणी सोडल्यानंतर सतत पूरस्थिती निर्माण होणाऱ्या एकतानगरीचे स्थलांतर करून पुनर्विकास केला जाणार आहे. यासाठी या भागात असलेल्या नियोजित पोलिस स्टेशनजवळील जागा निश्चितदेखील करण्यात आली आहे. त्यासाठीचा प्रस्ताव घेऊन महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी मंत्रालयात गेले होते.

आणखी वाचा-मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकारांवर कारवाईचा बडगा, वर्षभरात पोलिसांकडून ३३ गुन्हे दाखल

याबाबत अधिक माहिती देताना महापालिका आयुक्त डॉ. भोसले म्हणाले, एकतानगरी परिसरात वारंवार पुराचे पाणी शिरत आहे. पुन्हा पूर येऊ नये, यासाठी निळ्या पूररेषेतील बांधकाम काढून टाकणे गरजेचे आहे. यामुळे एकतानगरीचे पुनर्वसन गरजेचे आहे. समितीने तयार केलेल्या शिफारशीनुसार काही दीर्घकालीन तर काही अल्पकालीन उपाययोजना केल्या जाणार आहेत. एकतानगरीच्या पुनर्विकासासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या मान्यतेनंतर याची पुढील कार्यवाही सुरू केली जाईल. त्यासाठीचा प्रस्ताव घेऊन शहर अभियंता प्रशांत वाघमारे मंत्रालयात गेले आहेत. हा प्रकल्प लवकरच मार्ग लागेल आता विश्वास आहे त्यांनी व्यक्त केला.

Story img Loader