पुणे : केंद्र सरकारचे संरक्षण उत्पादनाच्या समूह केंद्र (क्लस्टर) उत्तर प्रदेश आणि तमिळनाडूमध्ये आहे. प्रत्यक्षात देशातील संरक्षण उत्पादन केंद्र महाराष्ट्रात आणि त्यातही पुण्यात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी केले. दरम्यान, या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यम प्रतिनिधींवर एके-४७ रोखून विनोदी कोटी केल्याने तो चर्चेचा विषय ठरला.

चाकणमध्ये निबे डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीच्या लघु शस्त्र उत्पादन सुविधेचे उद्गाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत आणि निबे ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे आदी उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, आपल्याकडे नाविन्यपूर्ण विचार करणाऱ्या तरुणांची वानवा पूर्वीपासून नाही. मात्र, त्यांना आधी संधी मिळत नव्हती. काळाची पावले ओळखून आपण २०१७ मध्ये संरक्षण उत्पादन धोरण जाहीर करून त्यासाठी निधीची तरतूद केली. त्यातून ३०० नवउद्यमींना मदत मिळून त्यांचे व्यवसाय सुरू झाले.

संरक्षण उत्पादनात अग्रेसर असल्यामुळे जगावर अमेरिकेचे वर्चस्व आहे. सर्व श्रीमंत देश हे संरक्षण उत्पादनात आघाडीवर आहेत. दुर्दैवाने या क्षेत्रात आपण मागे राहिलो. आता मेक इन इंडियाच्या माध्यमातून आपल्यालाही संरक्षण उत्पादन क्षेत्रात मोठी संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून या क्षेत्राला प्रोत्साहन दिले जात आहे. सरकारच्या या पावलामुळे संरक्षण उत्पादनात मोठी प्रगती करीत आहोत. केंद्र सरकारचे संरक्षण उत्पादन समूह केंद्र उत्तर प्रदेश आणि तमिळनाडूत आहे. मात्र, खऱ्या अर्थाने हे केंद्र महाराष्ट्रात आणि विशेषत: पुण्यात आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.

निबे ग्रुपच्या उत्पादन प्रकल्पाची पाहणी करीत असताना मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे हाताळली. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींवर एके-४७ बंदूक रोखून धरत महायुतीच्या बातम्या लावल्या नाहीत तर बघा, अशी कोटी केल्याने हशा पिकला. पूर्वी एके-४७ बंदूक दोन लाख रुपयांना मिळत होती. आता गणेश निबे यांच्यामुळे ती ४० हजार रुपयांत तयार होते, असेही त्यांनी नमूद केले.

Story img Loader