पुणे : राज्यात पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या ऑनलाइन कामकाजासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामकाजासाठी खासगी कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून, शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा कधी सुरू होणार याकडे पात्रताधारक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील जिल्हा परिषद शाळा, शासकीय, अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. रिक्त पदांचा शैक्षणिक कामकाजावर, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यामुळे राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याची घोषणा तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. त्यानुसार पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरतीचा पहिला टप्पा राबवण्यात आला. पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत १९ हजार ९८६ उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील पदभरतीनंतरही शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
हेही वाचा – पिंपरी: खंडणीखोरांविरोधात आक्रमक; औद्योगिक तक्रार निवारण पथकामार्फत ११ गुन्हे दाखल
हेही वाचा – माजी सैनिकांचा राष्ट्रनिर्मितीमध्ये सहभाग शक्य; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे मत
पवित्र संकेतस्थळामार्फत राबवलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यातील कामकाजासाठी ॲन्तोलॉजी इंटरनॅशनल या कंपनीला १८ लाख ५८ हजार ५०० रुपये, तर तलिस्मा कॉर्पोरेशन या कंपनीला ५५ लाख ५५ हजार ५०० रुपये देण्यास कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाजासाठी तलिस्मा कॉर्पोरेशन या कंपनीला ६८ लाख ८४ हजार १२० रुपये देण्यासही मान्यता देण्यात आली. त्यासाठीचा करारनामा शिक्षण आयुक्तांनी करण्याबाबत शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आता शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा कधी सुरू होणार याची राज्यभरातील पात्रताधारकांना प्रतीक्षा आहे.