लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: पुण्यातील अनेक दुकाने दुपारच्या वेळी बंद असतात. यात अनेक नामांकित दुकानांचाही समावेश होतो. यावरून वारंवार पुणेकरांची फिरकी घेतली जाते. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनीही ही संधी सोडली नाही. त्यांनी जाहीर कार्यक्रमात चितळेंचे दुकान आता बंद असेल का, अशी मिश्कील विचारणा केली.
भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात प्रभू बोलत होते. प्रभू यांनी पुण्यातील चितळे बंधू मिठाईवाले दुकानाचा उल्लेख केला. दुकान यावेळी बंद असेल का, अशी मिश्किल विचारणा त्यांनी केली. यावर सभागृहात एकच हशा पिकला. यानंतर प्रभू यांनीच दुकान चालू असल्याचा खुलासा केला. याचबरोबर कार्यक्रमाला येण्याआधी मी जाऊन पाहून आलो असून, दुकाने उघडे आहे, असे सांगितले. यावर सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.
आणखी वाचा- जागतिक बँकिंग संकटाला कारणीभूत असलेल्या चुका भारतातही घडल्या! सुरेश प्रभूंचा दावा
पुण्यातील नामांकित दुकाने आणि त्यांच्या दुपारी बंद असण्याच्या वेळा हा कायम विनोदाचा विषय ठरल्या आहेत. अनेक लेखकांनी याबाबत त्यांच्या लिखाणातून भाष्य केले आहे. याचबरोबर आता समाजमाध्यमांवरही मोठ्या प्रमाणात मीम्स यावर तयार केलेली दिसतात. हाच धागा पकडून प्रभू यांनी पुणेकरांना पुणेरी टोमणा मारल्याची प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाला उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती मृदुला भाटकर, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे, बँकेच्या अध्यक्षा डॉ.रेवती पैठणकर, उपाध्यक्षा दीपा दाढे, मुख्य कार्यकारी अध्यक्ष स्मिता देशपांडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात बँकेच्या पन्नास वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या ‘सुवर्ण भरारी’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया देसाई यांनी केले.