संथगती कामामुळे सांस्कृतिक वर्तुळात नाराजी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाटय़गृहाचे नूतनीकरण चार महिन्यांत पूर्ण करायचे आहे, असे सांगून महापालिकेने नाटय़गृह बंद ठेवले. तब्बल १८ कोटी रुपये खर्च करून करण्यात येणाऱ्या या नूतनीकरणाचे काम चार महिन्यांनंतरही रडतखडत सुरू आहे. नाटय़गृह कधी सुरू होणार, या विषयी कोणाकडेच खात्रीशीर माहिती नाही. त्यामुळे पालिकेच्या या नियोजनशून्य कारभाराविषयी सांस्कृतिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

चिंचवड नाटय़गृहाच्या नूतनीकरणासाठी दोन मेपासून नाटय़गृह बंद ठेवण्यात आले आहे. चार महिन्यांत अर्थात दोन सप्टेंबपर्यंत हे काम पूर्ण होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात, अजूनही नूतनीकरणाचे काम सुरूच आहे. बरेच काम शिल्लक असून ते कधी पूर्ण होईल, याविषयी कोणीही अधिकारी खात्रीने माहिती देऊ शकत नाही. नूतनीकरणासाठी १८ कोटी रुपये खर्चाचे नियोजन असून त्यातील चार कोटी विद्युत विभागासाठी तर १४ कोटी स्थापत्य विभागासाठी खर्च करण्यात येणार आहेत. प्रत्यक्षात, इतक्या खर्चाची गरज आहे का आणि होत असलेल्या कामांमध्ये नेमके काय बदल केले जाणार आहेत, या विषयी साशंकता व्यक्त केली जाते.

शहरातील विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षांना कार्यक्रम घेण्यासाठी चिंचवड नाटय़गृह ही हक्काची जागा मानली जाते. त्यामुळे चार महिने नाटय़गृह बंद ठेवण्यास अनेकांचा विरोध होता. तथापि, नूतनीकरणामागे अनेकांचे छुपे अर्थकारण गुंतले असल्याने संगनमत करून अट्टहासाने काम सुरू करण्यात आले. त्यानंतर मात्र त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. कोणतेही नियोजन नसल्यामुळे हे काम रडतखडत सुरू आहे. या विषयी बराच आरडाओरडा सुरू झाल्यानंतर पक्षनेते एकनाथ पवार यांनी रविवारी सुटीच्या दिवशी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला. मात्र, त्यानंतरही नाटय़गृह कधी सुरू होणार, या विषयी स्पष्टता नसल्याचे दिसून येते. नाटय़गृहाच्या नूतनीकरणाची घोषणा करण्यात आली, तेव्हा जाहीर केलेल्या बऱ्याच गोष्टी गुंडाळण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नाटय़गृहात बहुपडदा सिनेमागृहांप्रमाणे आकर्षक खुच्र्या बसवण्यात येणार होत्या. प्रत्यक्षात त्याच खुच्र्या कायम ठेवण्याचा निर्णय झाला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When the more theater will start