लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) बीबीए, बीएमएस, बीसीए आणि बीबीएम या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पुरवणी प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी २९ जुन ते ३ जुलै या कालावधीत ऑनलाइन अर्ज नोंदणी करता येणार आहे. २९ मे रोजी झालेली परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा परीक्षा देता येणार असून, दोन परीक्षांतील सर्वोत्तम पर्सेंटाइल ग्राह्य धरले जाणार आहेत. परीक्षेची तारीख स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे.
सीईटी सेलने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. बीबीए, बीएमएस, बीसीए आणि बीबीएम या अभ्यासक्रमांसाठी यंदा पहिल्यांदाच सीईटी सेलद्वारे प्रवेश परीक्षा घेण्यात आली. मात्र कमी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यामुळे राज्यभरातील या अभ्यासक्रमांच्या जागा रिक्त राहण्याची भीती व्यक्त करत संस्थाचालकांनी व्यक्त केली. तसेच काही विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी मिळाली नाही. त्यामुळे पुरवणी परीक्षेची मागणी करण्यात आली. ही मागणी मान्य करत राज्य सरकारने पुरवणी परीक्षा घेण्यास मान्यता दिली. त्यामुळे परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे.
आणखी वाचा-युजीसी-नेट परीक्षेत आता नव्या विषयाची भर… विषय कोणता, कधीपासून उपलब्ध?
या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने प्रसिद्धिपत्रकाद्वारे २९ जुन ते ३ जुलै या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येणार असल्याचे स्पष्ट केले. पुरवणी परीक्षा राज्यातील आणि राज्याबाहेरील केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे. परीक्षेची तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम, माहितीपुस्तका आणि अधिक माहिती https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.