लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : ‘शहराची वाढती लोकसंख्या पाहता पाण्याचे स्रोत वाढविले जात आहेत. आंद्रा धरणातून शंभर आणि भामा आसखेड धरणातून १६७ असे २६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणले जाणार आहे. या प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असून डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर दररोज पाणीपुरवठा करण्याबाबतचा निर्णय शहराने घ्यावा,’ अशी भूमिका महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मांडली.

आयुक्त शेखर सिंह यांनी सोमवारी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ कार्यालयाला भेट दिली. त्या वेळी संपादकीय विभागाबरोबर झालेल्या संवादात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘नागरीकरण झपाट्याने वाढत असून शहराची लोकसंख्या २७ लाखांच्या घरात गेली आहे. महापालिका प्रतिदिन पवना धरणातून ५२० दशलक्ष लिटर (एमएलडी), आंद्रा धरणातून ८० आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून १५ असे ६१५ दशलक्ष लिटर पाणी उचलते. परंतु, वाढत्या लोकसंख्येला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी हे पाणीही अपुरे पडत आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. आंद्रा धरणातून शंभर आणि भामा आसखेड धरणातून १६७ असे २६७ दशलक्ष लिटर पाणी आल्यानंतर दररोज पाणीपुरवठा करण्याबाबतचा निर्णय शहराने घ्यावा. या प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२५ अखेर पूर्ण होईल.’

पाण्याच्या पुनर्वापरावर भर

‘पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती शासनाने उठविली आहे. त्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. खासगी टँकरवर महापालिकेचे नियंत्रण नाही. उन्हाळ्यात पाणी वितरण कमी केले जात नाही. पाण्याची मागणी वाढते. महापालिकेच्या पाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया केली जाते. मोठ्या गृहनिर्माण संस्था टँकरचे पाणी पिण्यासाठी वापरत नाहीत. पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर देण्यात येणार असून शंभर एमएलडी क्षमतेचे प्रकल्प उभारले जाणार आहेत,’ असे सिंह यांनी सांगितले.

आणखी एक कचरा डेपो आवश्यक

पुनावळे कचरा डेपोचा विषय संवेदनशील आहे. शहराला दुसऱ्या कचरा डेपोची आवश्यकता आहे. परंतु, त्याला विरोध आहे. नागरिकांशी संवाद साधला. पण, त्यांची समजूत काढण्यात यश आले नाही. डेपो रद्द झाल्याबाबत शासनाचे कोणतेही पत्र आले नाही. घर खरेदी करताना आसपास कोणते प्रकल्प येणार आहेत, याची माहिती नागरिकांनी घेतली पाहिजे. कोठे, कोणते आरक्षण प्रस्तावित आहे, याची माहिती विकास आराखड्यात असून हा आराखडा पालिकेच्या संकेतस्थळावर असल्याचेही त्यांनी सांगितले.

आयुक्त उवाच…

  • मिळकतकरात वाढ नाही
  • ताथवडे, चिखली, किवळेत सांडपाणी प्रकल्पाचे काम सुरू
  • विकास आराखड्यातील नवीन ३८ रस्त्यांचे काम हाती
  • थेरगावात शंभर खाटांचे कर्करोग रुग्णालय
  • देहूरोड कटक मंडळ महापालिकेत येणार नाही
  • हिंजवडीचा महापालिकेत समावेश करण्याबाबत २०१६ मध्ये ठराव मंजूर
  • मुळा नदी सुधारचे काम सुरू
  • बीआरटी बंद केली जाणार नाही
  • रेडझोन हद्दीचा अचूक नकाशा लवकरच
  • हवा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी श्रेणीबद्ध कृती प्रतिसाद योजना
  • रात्री दहानंतर बांधकामांवर बंदी
  • जीबीएसच्या रुग्णांसाठी थेरगाव, वायसीएम रुग्णालयात खाटा आरक्षित

Story img Loader