गणेश यादव, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात प्रचारासाठी येणाऱ्या सत्ताधारी भाजप नेत्यांना उद्घाटनासाठी वेळ मिळत नसल्याने ६६ कोटी रुपये खर्च करून उभारलेले निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर (गदिमा) नाट्यगृह आठ महिन्यांपासून कुलूपबंद आहे. नाट्यगृहाचे कामकाज जुलै महिन्यातच पूर्ण झाले असून, उद्घाटनासाठी नेत्यांची दोन वेळा मिळालेली वेळ अचानक रद्द झाली. त्यामुळे या नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पिंपरी-चिंचवडकरांची सांस्कृतिक भूक भागविण्याबरोबरच स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी प्राधिकरणामध्ये सुसज्ज असे नाट्यगृह उभारण्यात आले आहे. प्राधिकरणातील पाच हजार चौरस मीटर भूखंडावर हे नाट्यगृह बांधण्यात आले आहे. सुरुवातीला ३७ कोटी २५ लाख रुपयांमध्ये हे काम केले जाणार होते. सन २०१७ मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ठेकेदाराने हे काम संथगतीने केले. त्यामुळे तीन वर्षांच्या मुदतीत काम पूर्ण झाले नाही. या कामासाठी तब्बल आठ वर्षे लागली. त्यामुळे नाट्यगृहाचा खर्च ३७ कोटींवरून सुमारे ६६ कोटींवर गेला.

आणखी वाचा- पुणे: दहशत माजविणाऱ्या सराईतावर स्थानबद्धतेची कारवाई

शहरातील महापालिकेच्या इतर नाट्यगृहांपेक्षा गदिमा नाट्यगृह वेगळे आहे. यामध्ये एक मिनी थिएटर, ॲम्फी थिएटर, हॉल, कलादालन मल्टिप्लेक्ससारखे थिएटर आहे. शहरातील नाट्यगृहांमध्ये नाटकांव्यतिरिक्त इतर खासगी कार्यक्रम जास्त होत असतात. त्यामुळे नाट्यकलावंतांना व कलाकारांना कला सादरीकरणास शहरात वाव मिळत नाही. त्यामुळे अनेक कलाकार पुण्यातील नाट्यगृहांना प्राधान्य देतात. नाट्यकलाकारांना नाटकांच्या तालमीला जागा नाही. कला सादरीकरणासाठी कलादालन असावे, अशी शहरातील कलावंतांची इच्छा आहे. त्यांची प्रतीक्षा गदिमा नाट्यगृहाद्वारे पूर्ण होणार आहे. मात्र, नाट्यगृहाचे काम पूर्ण होऊनही अद्याप उद्घाटनासाठी किती प्रतीक्षा पाहावी, अशी विचारणा कलावंतांकडून केली जात आहे.

नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी नेत्यांची दोनदा वेळ मिळाली होती. मात्र, काही कारणांमुळे नेत्यांचा दौरा रद्द झाला. त्यामुळे उद्घाटन रखडले. केवळ नेत्यांना वेळ मिळत नसल्याने नाट्यगृहे कुलूपबंद ठेवल्याने शहरातील कलाकारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा- राज्यात जमिनींच्या छोट्या तुकड्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारांची दस्त नोंदणी होणार

नाट्यगृहाची वैशिष्ट्ये

-एकाच ठिकाणी दोन नाट्यगृहे

-प्रशस्त हॉल

-कलादालन

-स्थानिक कलावंतांच्या सरावासाठी स्वतंत्र सभागृह

-तळघरात दुमजली वाहनतळ

प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृहाचे लवकरात लवकर उद्घाटन करावे, अशी आमचीही भूमिका आहे. त्यासाठी आम्ही नेत्यांच्या संपर्कात आहोत. -नामदेव ढाके, माजी गटनेते, भाजप

शहरातील नागरिकांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी नाट्यगृह उभारले आहे. नाट्यगृहाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने नाट्यगृहाचे उद्घाटन करून कलाकारांसाठी खुले करावे. -अमित गावडे, माजी नगरसेवक, निगडी

प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृहाचे काम पूर्ण झाले आहे. आम्ही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहोत. -डॉ. ज्ञानदेव जुंधारे, सह शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When will g d madgulkar theatre will open pune print news ggy 03 mrj
Show comments