पुणे : गेले दोन महिने उकाड्याने हैराण झाल्यानंतर आता मोसमी पावसाची उत्सुकता निर्माण झाली आहे. नैऋत्य मोसमी वारे दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांवर १९ मे रोजी दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण हिंद महासागरात वाऱ्याची प्रती चक्रीय स्थिती निर्माण होऊन वारे उत्तरेला वाटचाल करतात. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे विषुववृत्त पार केल्यानंतर त्यांची वाटचाल नैऋत्य दिशेने सुरू होते. अंदमानमध्ये नैऋत्य दिशेने वारे दाखल होतात. या वाऱ्यांमुळे ढगांची निर्मिती होऊन पाऊस पडतो. अंदमानमध्ये सुमारे २४ तास पाऊस पडल्यावर नैऋत्य मोसमी वारे अंदमानमध्ये दाखल झाल्याचे जाहीर केले जाते.

हेही वाचा – मावळ लोकसभा: रायगड जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात फेर मतदान व्हावे असे श्रीरंग बारणे का म्हणाले?

या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वारे शनिवारी (१९ मे) देशाच्या महासागरीय क्षेत्रात म्हणजे बंगालच्या उपसागरातील आग्नेय भागात, दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटावर धडक देण्याचा अंदाज आहे. सर्वसाधारणपणे मोसमी वारे सरासरी २२ मे रोजी अंदामानात दाखल होतात. त्यानंतर आठवड्याभरात, १ जूनच्या सुमारास देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे केरळमध्ये दाखल होतात. मात्र बंगालच्या उपसागरातील वाटचालीवर मोसमी वाऱ्यांचे केरळमध्ये दाखल होणे अवलंबून असते. त्यामुळे आता मोसमी वारे अंदमानात दाखल होण्याची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा – …अन पार्थ पवारांचा पराभव आम्ही विसरू शकत नाहीत – संजोग वाघेरे

पालघर, ठाण्यात उष्णतेची लाट शक्य

हवामान विभागाने सोमवारी पालघर आणि ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मुंबईत आर्द्रतायुक्त उष्ण हवामानाचा अंदाज आहे. विदर्भ वगळता राज्याच्या अन्य भागांत सोमवारपासून अवकाळी पावसाचा जोर कमी होण्याची, तसेच राज्यात तुरळक ठिकाणी १७ मेपर्यंत हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोमवारी जळगावात सर्वाधिक ४१.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When will monsoon winds enter andaman meteorological department gave good news pune print news dbj 20 ssb