पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांतर्फे शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात. त्यानुसार छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेतर्फे (सारथी) दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची यादी रखडली असून, या विलंबाचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना सारथी संस्थेतर्फे परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी ७५ विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यंदा या शिष्यवृत्तीसाठी सुमारे १५० विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, सारथी संस्थेकडून अद्यापही निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. परदेशातील शिक्षण संस्थांचे शैक्षणिक कामकाज सुरू झाले आहे. त्यामुळे सारथीच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. सारथी संस्थेकडून निवडयादी कधी जाहीर केली जाणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
हेही वाचा : पिंपरी : पर्यटनाच्या बहाण्याने नारळ पाणी विक्रेत्याकडून खंडणीसाठी घरमालकाचे विमानाने अपहरण; बेटावर डांबले
सारथीतर्फे दिल्या जाणाऱ्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचे दुसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षीही असाच गोंधळ झाला होता. ७५ जागा असताना ५० विद्यार्थ्यांनाच संधी देण्यात आली होती. यंदा अर्ज प्रक्रिया पूर्ण करूनही निवडयादी जाहीर करण्यात आली नाही. आता आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थी परदेशी शिक्षणाची संधी गमावण्याची भीती आहे. सारथी संस्थेच्या निष्काळजीपणामुळे विलंब होऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, असे स्टुंडट्स हेल्पिंग हँडचे कुलदीप आंबेकर यांनी सांगितले.
परदेशी शिष्यवृत्तीच्या निवडयादीबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच त्याबाबत एक बैठक झाली आहे आणि आणखी एक बैठक होणार आहे.
अशोक काकडे, महासंचालक, सारथी