पुणे : शिक्षक होण्याची इच्छा असलेले उमेदवार अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार येत्या मे आणि जूनमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात येणार असून, उमेदवारांनी त्यासाठीची पूर्वतयारी करण्याचे आवाहन परीक्षा परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
राज्यात पवित्र संकेतस्थळामार्फत स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षण भरतीची प्रक्रिया राबवण्यात येते. शिक्षक भरतीमध्ये शैक्षणिक पात्रतेसह अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी महत्त्वाची आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारे पात्र उमेदवारांची निवड करण्यात येते. २०१७मध्ये झालेल्या चाचणीनंतर २०२२ मध्ये शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यात आली होती. आता शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू होत असल्याने पात्रताधारक या चाचणीच्या प्रतीक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी २०२५ ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने मे, जूनमध्ये आयोजित करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी त्यासाठीची पूर्वतयारी करावी. परीक्षेची अधिसूचना https://www.mscepune.in/ या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यात सुमारे १८ हजार शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे. तर पहिल्या टप्प्यात रिक्त राहिलेल्या पदांचा समावेश आता दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत केला जाणार आहे. त्यानुसार पवित्र संकेतस्थळावर जाहिराती नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. २०१७ च्या शासन निर्णयानुसार वर्षातून दोन वेळा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्याची तरतूद होती. तर २०१९ च्या शासन निर्णयानुसार आवश्यकतेनुसार चाचणी घेण्याची तरतूद आहे. परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी मे, जूनमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.