पुण्यातील विद्यापीठ चौक आणि चांदणी चौकातील रेंगाळलेले उड्डाणपुलांचे काम, त्यामुळे होणारी वाहतूककोंडी आणि पुणेकरांना होणारा त्रास याबाबत गुरुवारी थेट विधिमंडळातच प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र, याबाबत संबंधित यंत्रणांची बैठक बोलविण्यात येईल, असे मोघम उत्तर राज्य सरकारकडून देण्यात आल्याने शहरातील वाहतूककोंडीच्या समस्येवर सध्यातरी कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याचे समोर आले आहे. या स्थितीत पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार तरी कधी, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार भीमराव तापकीर आणि सिद्धार्थ शिरोळे यांनी विधिमंडळात पुणे शहराच्या वाहतूक कोंडीबाबत लक्षवेधी सूचना मांडली. चांदणी चौक उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत या ठिकाणी एक ते दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. या ठिकाणी वाहतूक पोलीस नेमण्याची आवश्यकता आहे, अशी सूचना आमदार तापकीर यांनी केली. तसेच आनंदऋषीजी (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) चौकातील नवीन उड्डाणपुलाचे काम संथ गतीने होत असून नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे. या उड्डाणपुलाच्या कामाशी संबंधित प्रशासनाने वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवावे आणि उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यासंबंधीचा कालावधी निश्चित करावा, असे आमदार शिरोळे यांनी सुचविले.

राज्या शासनाच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यावर उत्तर दिले. केसरकर म्हणाले,की चांदणी चौक परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात येईल आणि याबाबत संबंधित यंत्रणांची गणेशोत्सवानंतर बैठक बोलावण्यात येईल. शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची २३.३ किलोमीटर लांबी आहे. संकल्पना करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वानुसार हा प्रकल्प बांधण्यात येत आहे. या कामास सुरुवात झाली असून प्रकल्प कालावधी ४० महिने आहे. या प्रकल्पातील एकात्मिक उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या कामामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी एकेरी मार्ग करणे, वाहने लावण्यास आणि थांबण्यास बंदी करणे, सायकल मार्ग आणि पदपथ काढून रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे.

बालेवाडी ते विद्यापीठ ९० मिनिटे… –

विद्यापीठ चौक पुण्यातील पाषाण, सूस, बालेवाडी, बाणेर, औंध, बोपोडी, सांगवी, हिंजेवाडी अशा विस्तारलेल्या उपनगरांशी जोडला जातो. शहराच्या दक्षिण आणि उत्तर भागांना जोडणारा हा वाहतूक मार्ग आहे. येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी केवळ याच चौकाचा विचार न करता गर्दीच्या वेळी ब्रेमेन चौक, पाषाण चौक, बाणेर चौक येथपर्यंत नियोजन करणे आवश्यक आहे. हा चौक पुण्याचे एक प्रमुख प्रवेशद्वार आहे. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो आणि नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम सुलभ करण्यासाठी पूर्वीचा (चुकीचा आरेखन केलेला) उड्डाणपूल दोन वर्षांपूर्वी पाडण्यात आला. नवीन दुहेरी उड्डाणपुलाचे बांधकाम अतिशय संथ गतीने चालू आहे. बालेवाडी वरून विद्यापीठाकडे पोहोचयला आता जवळपास ९० मिनिटे, तर विद्यापीठ चौक ते संचेती रुग्णालयापर्यंत ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो. वाहतूक पोलिस, महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), विभागीय आयुक्त आणि बांधकाम कंत्राटदार टाटा यासह सर्व संबंधित विभाग एकत्रितपणे आणि समन्वयाने काम करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, दुर्दैवाने त्यात सातत्याचा अभाव आहे, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.

चार वर्षांपासून काम सुरूच –

चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम सन २०१८ पासून रखडले आहे. भूसंपादन, करोना, टाळेबंदी अशा विविध कारणांमुळे या उड्डाणपुलाचे काम रेंगाळले असून हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक कोंडी सोडवण्याची जबाबदारी स्थानिक आणि राज्य शासनाकडे आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When will the people of pune get relief from the traffic jam blocked flyovers citizens panic pune print news msr