लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पुणे स्टेशन परिसरातील साधू वासवानी पूल पाडण्याचे काम २० टक्के पूर्ण झाले असून, रेल्वे विभाग, वाहतूक पोलीस यांची या कामासाठी परवानगी मिळाली आहे. या पुलाचे संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी आणखी दीड वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

पुणे स्टेशन परिसरात असलेल्या साधू वासवानी पुलाच्या बांधकामाला ५० पेक्षा अधिक वर्षे झाली आहेत. हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरला होता. त्यामुळे हा पूल पाडून तेथे नवीन उड्डाणपुल उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. हे काम सुरू करण्याची परवानगी मे २०२३ मध्ये देण्यात आली होती. मात्र वाहतूक पोलीस तसेच रेल्वे विभागाची मान्यता न मिळाल्याने हे काम सुरु होण्यास एक वर्षे विलंब झाला. पाच महिन्यांपूर्वी मे २०२४ मान्यता मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून कोरेगाव पार्कच्या बाजुने हा पूल पाडण्याच्या कामाला जून महिन्यात सुरुवात झाली.

आणखी वाचा-राज्य सरकारचेच अधिकारी, कर्मचारी हक्काच्या वेतनापासून वंचित… प्रकरण काय?

कोरेगाव पार्ककडील भागातील जुना पूल पाडण्याचे काम महापालिकेने पूर्ण केले आहे. तेथे नवीन पुलाचे काम करण्यासाठी आवश्यक खोदकाम करून पाया करण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. आतापर्यंत पुलाचे काम २० टक्के पूर्ण झाले आहे. या पुलाच्या पुणे कॅन्टोन्मेंटकडील दुसऱ्या बाजुचे पाडकाम करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉकचे (वेळेचे) वेळापत्रक मिळण्याची आवश्यकता आहे. या ब्लॉकसाठी पुणे महापालिकेने रेल्वेकडे पैसे देखील भरले आहेत.

आणखी वाचा-बोपदेव देव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांची खबऱ्यांवर भिस्त, पोलीस आयुक्तालयात बैठक

या ब्लॉकच्या ५२ दिवसांच्या कालावधीत हे काम करावे लागणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून महापालिकेस टप्प्याटप्यानुसार दिल्या जाणाऱ्या वेळेनुसार आणि रेल्वे प्रशासनाच्या देखरेखीखाली हे काम करण्यात येणार आहे, असे डॉ. भोसले यांनी सांगितले. पुलाचे काम करण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक विभागाची परवानगी मिळाली असून रेल्वेचे वेळापत्रक आल्यानंतर हे काम वेगाने पूर्ण होईल, असे डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले. या पुलाचे संपूर्ण काम होण्यासाठी अजुन दीड वर्षाचा कालावधी लागणार असून जानेवारी २०२६ मध्ये हे संपूर्ण काम पूर्ण होऊन त्यावरून वाहतूक सुरु होईल, असे ते म्हणाले.