पुणे : प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने सदाशिव पेठेत भररस्त्यात महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याने वार करुन तिचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शंतनू लक्ष्मण जाधव (वय २१, रा. डोंगरगाव, ता. मुळशी) असे पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या हल्लेखोर तरुणाचे नाव आहे. महाविद्यालयीन तरुणीने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने आरोपी शंतूनने मंगळवारी ( २७ जून) सकाळी सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलिस चौकीजवळ तरुणीवर कोयत्याने हल्ला केला. हल्ल्यात तरुणीच्या डोक्याला आणि हाताला जखम झाली आहे. याबाबत तरुणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधवविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>आधी मैत्री मग मतभेद आणि आता जीवघेणा हल्ला, पुण्यात विद्यार्थिनीवर झालेल्या हल्ल्याबाबत पोलीस म्हणाले…

जाधव याला बुधवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती सरकारी वकील ॲड. वर्षाराणी जाधव यांनी केली. न्यायालयाने आरोपी जाधव याला एक जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिस उपनिरीक्षक पुनम पाटील तपास करत आहोत.

हेही वाचा >>>“त्या मुलीची जात कुठली?…”, पुण्यातील कोयता हल्ल्याप्रकरणी लेशपालची इन्स्टा स्टोरी चर्चेत

कोयता कोठून आणला ?

आरोपी शंतनू जाधवने तरुणीवर कोयत्याने हल्ला केला. त्याने कोयता कोठून आणला, तसेच त्याने तरुणीवर हल्ला कोणाच्या सांगण्यावरुन केला आहे का?, यादृष्टीने तपास करायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. आरोपीची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. त्याच्या रक्ताचे नमुने काढून ते रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात येणार आहेत. शंतनूची गुन्हेगारी पार्श्वभूमी पोलिसांकडून तपासण्यात येणार आहे, असे सरकारी वकील ॲड. वर्षाराणी जाधव यांनी न्यायालयात सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Where did the accused who attacked the college girl get the knife pune print news rbk 25 amy
Show comments