पुणे : देशभरात गेल्या काही वर्षांत घरांच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. घरांच्या किमती वाढत असताना त्यांच्या भाड्यातही वाढ होताना दिसत आहे. पुण्यात गेल्या ३ वर्षांत घरांच्या किमतीत ३७ टक्के वाढ झाली असून, घरभाड्यात ५७ ते ६५ टक्के वाढ झाली आहे. यामुळे पुण्यात घरांच्या किमतीपेक्षा घरभाड्यातील वाढीचा वेग जास्त असल्याचे समोर आले आहे.
अनारॉक ग्रुपने मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार, देशात बंगळुरू, मुंबई, दिल्ली आणि हैदराबादमध्ये घरांच्या किमतीतील वाढ ही भाडेवाढीपेक्षा जास्त आहे. याचवेळी पुणे, कोलकता, चेन्नईमध्ये घरांच्या किमतीतील वाढ ही भाडेवाढीपेक्षा कमी आहे. पुण्यात हिंजवडी आणि वाघोली या परिसरात घरांच्या किमती सर्वाधिक आहे. या भागात माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे त्या परिसरात घरांना आयटी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांकडून मोठी मागणी आहे. याचवेळी घरे भाड्याने घेण्याचे प्रमाणही या परिसरात जास्त आहे.

हिंजवडीत १ हजार चौरस फूट (२ बीएचके) घराची सरासरी किंमत २०२१ च्या अखेरीस प्रति चौरसफूट ५ हजार ७१० होती. ती २०२४ च्या अखेरीस ७ हजार ८०० रुपयांवर पोहोचली. हिंजवडीत घरांच्या किमतीत गेल्या ३ वर्षांत ३७ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. हिंजवडीतील घरभाडे २०२१ च्या अखेरीस १७ हजार ८०० रुपये होते. ते २०२४ च्या अखेरीस २८ हजार रुपयांवर पोहोचले. गेल्या ३ वर्षांत हिंजवडीत घरभाड्यात ५७ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे तिथे घरांच्या किमतीपेक्षा भाडेवाढीचा वेग अधिक असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

वाघोलीत १ हजार चौरस फूट (२ बीएचके) घराची सरासरी किंमत २०२१ च्या अखेरीस प्रति चौरसफूट ४ हजार ९५१ रुपये होती. ती २०२४ च्या अखेरीस ६ हजार ८०० रुपयांवर गेली. घरांच्या किमतीत ३ वर्षांत ३७ टक्के वाढ झाली आहे. याचवेळी वाघोलीत घरभाडे २०२१ च्या अखेरीस १४ हजार २०० रुपये होते. ते २०२४ च्या अखेरीस २३ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या ३ वर्षांत तेथील घरभाड्यात ६५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे वाघोलीतही घरांच्या किमतीपेक्षा भाडेवाढीचा वेग अधिक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पुण्यातील घरांची प्रति चौरसफूट किंमत (रुपयांत)

भाग २०२१ अखेरीस२०२४ अखेरीसवाढ
हिंजवडी ५,७१०७,८००३७ टक्के
वाघोली ४,९५१६,८००३७ टक्के

पुण्यातील २ बीएचकेचे घरभाडे (रुपयांत)

भाग २०२१ अखेरीस२०२४ अखेरीसवाढ
हिंजवडी १७,८००२८,०००५७ टक्के
वाघोली १४,२००२३,५००६५ टक्के

Story img Loader