पुणे : पुण्यात फेब्रुवारी महिन्यात १९ हजार घरांची विक्री झाली असून, त्यात ५० लाख रुपयांपर्यंतच्या घरांचे प्रमाण निम्म्याहून अधिक आहे. त्यामुळे नागरिकांचा कल परवडणाऱ्या घरांकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नाइट फ्रँक इंडियाने पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील मालमत्ता क्षेत्राचा फेब्रुवारी महिन्याचा अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार, गेल्या महिन्यात एकूण १९ हजार १२ घरांची विक्री झाली. त्यातून सरकारला ७१२ कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क मिळाला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात १८ हजार ७९१ घरांची विक्री झाली होती आणि त्यातून ६६२ कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क मिळाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत घरांच्या विक्रीत १ टक्का आणि मुद्रांक शुल्कात ७.६ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. घरांच्या विक्रीत १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांचे प्रमाण जास्त असल्याने मुद्रांक शुल्क महसुलात वाढ झाली आहे.
एकूण विक्रीत २५ लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या घरांचे प्रमाण २२ टक्के आणि २५ ते ५० लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या घरांचे प्रमाण ३० टक्के आहे. त्यामुळे एकूण विक्रीमध्ये ५० लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या घरांचे प्रमाण ५२ टक्के आहे. पुण्यात ५० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतच्या घरांच्या विक्रीचे प्रमाण ३२ टक्के आहे. याच वेळी १ ते २.५ कोटी रुपयांपर्यंतच्या घरांच्या विक्रीचे प्रमाण १४ टक्के असून, २.५ ते ५ कोटी रुपयांपर्यंतच्या घरांचे प्रमाण २ टक्के आहे. पुण्यात ५ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या घरांच्या विक्रीचे प्रमाण १ टक्क्याहून कमी आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
घरांची आकारमानानुसार विक्री
घरांचा आकार (चौरस फूट) | विक्रीतील प्रमाण (टक्क्यांमध्ये) |
५०० | २३ |
५०० ते ८०० | ४५ |
८०० ते १००० | १५ |
१००० ते २००० | १४ |
२००० पेक्षा जास्त | ३ |
पुणे परिसरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. यामुळे घरांच्या विक्रीतील वाढ कायम आहे. याचबरोबर इतर शहरांच्या तुलनेत पुण्यातील घरे परवडणारी असल्याने येथील गृहनिर्माण बाजारपेठेत सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. -शिशिर बैजल, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, नाइट फ्रँक