ओरिसा राज्यातील नक्षलवाद भागातून विक्रीसाठी पुण्यात गांजा घेऊन येणाऱ्या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून एक लाख २९ हजार रूपये किमतीचा २१ किलो गांजा आणि इतर माल जप्त करण्यात आला आहे.  या दोघांचा नक्षलवादी कारवायांशी काही संबंध आहे का याचा तपास पोलीस घेत आहेत.
निरंजन सावले माळी (वय २३, रा. अंतरावा, जिल्हा-गजपती) आणि बनमाली सोबा नाग (वय ३७, रा. अंतरझोली, जिल्हा- रायगडा दोघेही- ओरिसा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी अशोक पेरणेकर यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली,की ओरिसामधून एक व्यक्ती पुणे स्टेशन परिसरात गांजा घेऊन येणार आहे. त्यानुसार पथकाचे पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी सोमवारी दुपारी सापळा रचला. पुणे स्टेशन जवळील सागर हॉटेल समोर एक व्यक्ती संशयितरीत्या आढळून आली. त्याच्या हातात दोन बॅग होत्या. त्या दुसऱ्या व्यक्तीकडे देताना दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्याच्याजवळील बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा असल्याचे आढळून आले. माळी याने ओरिसाच्या नक्षलवादी भागातून हा गांजा आणल्यामुळे त्याचा नक्षलवादी कारवाईशी काही संबंध आहे का याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विनोद पाटील अधिक तपास करत आहेत.