गुजरातचा पर्यटन क्षेत्रातील विकास हा साडेतेरा टक्के असून गुजरातमध्ये ‘इव्हेंटबेस टुरिझम’वर भर दिला जात असल्याचे टुरिझम कॉर्पोरेशन ऑफ गुजरात लिमिटेडचे अध्यक्ष कमलेश पटेल यांनी शनिवारी सांगितले. ‘व्हाईट रण फेस्टिव्हल’ १४ डिसेंबरपासून सुरू होत असल्याची घोषणाही पटेल यांनी या वेळी केली.
टुरिझम कॉर्पोरेशन ऑफ गुजरात लिमिटेडतर्फे गुजरातमधील पर्यटनाबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी टुरिझम कॉर्पोरेशनचे सनाथन पंचौली उपस्थित होते. गुजरातमध्ये आयोजित करण्यात येणारे ‘व्हाईट रण फेस्टिव्हल’ १४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. यावर्षी प्रथमच तीन महिने हा फेस्टिव्हल चालणार आहे. या फेस्टिव्हलसाठी कच्छच्या रणामध्ये ३५० तंबूंचे गाव उभे करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये पपेट शो, मुलांसाठी खेळ, साहसी खेळ, हेलिकॉप्टरची फेरी अशा विविध सुविधा आहेत. या फेस्टिव्हलसाठी १ डिसेंबरपासून नोंदणी सुरू होणार आहे. या फेस्टिव्हल दरम्यान २५ ते ३१ डिसेंबरदरम्यान पॅराग्लायडिंगच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
‘गुजरात दरवर्षी ४८० कोटी रुपये पर्यटन क्षेत्रासाठी खर्च करत असून दरवर्षी साडेतेरा टक्क्य़ांनी गुजरातच्या पर्यटन क्षेत्राची वाढ होत आहे. दरवर्षी टुरिझम कॉर्पोरेशन ऑफ गुजरात लिमिटेडला ३४ कोटी रुपये नफा होत आहे,’ अशी माहिती पटेल यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशभरातील शेतकऱ्यांकडून लोखंडाचा एक तुकडा
सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याची घोषणा गुजरात सरकारने केली आहे. या पुतळ्यासाठी देशातील प्रत्येक शेतकऱ्याकडून त्याला नको असलेला लोखंडाचा एक तुकडा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी गुजरातमधील मंत्री देशातील ५६२ गावांना भेटी देणार आहेत. हा पुतळा तीन वर्षांमध्ये उभा राहणार असून, त्यासाठी अडीच हजार कोटी रुपये खर्च येणार आहे, अशी माहिती टुरिझम कॉर्पोरेशन ऑफ गुजरात लिमिटेडचे अध्यक्ष कमलेश पटेल यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: White rann festival from 14th december
Show comments