पुणे : ‘भारताची चीनबरोबरची व्यापारी तूट २००४ मध्ये २ अब्ज डॉलर होती. काँग्रेस सरकारच्या दशकभराच्या कार्यकाळात ती ४० अब्ज डॉलरवर पोहोचली. त्यामुळे काँग्रेसचा चीनशी कोणता गुप्त करार झाला होता, हे एकदा राहुल गांधी यांना विचारावे लागेल,’ अशी टीका केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी केली.

परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या (पीआयसी) वतीने आयोजित एशिया इकॉनॉमिक डायलॉग परिषदेत गोयल गुरुवारी बोलत होते. ‘पीआयसी’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि परिषदेचे संयोजक गौतम बंबावले यांनी गोयल यांच्याशी संवाद साधला. भारताची चीनशी असणारी व्यापारी तूट शंभर अब्ज डॉलरवर गेली असून, निर्यातीपेक्षा आयात प्रचंड वाढल्याबाबत गोयल यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर गोयल म्हणाले, ‘भारताची चीनशी असणारी व्यापारी तूट २००४ मध्ये २ अब्ज डॉलर होती. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात २०१४ पर्यंत ती वाढून ४० अब्ज डॉलरवर गेली. काँग्रेस सरकारच्या दशकभराच्या काळात व्यापारी तूट सरासरी वार्षिक ४५ टक्क्यांनी वाढली. या कालावधीत चीनमधून हलक्या दर्जाच्या वस्तू मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारपेठेत आल्या. त्यातून भारतीय ग्राहकांना स्वस्तात खराब माल घेण्याची सवय लागली.’

निव्वळ थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) घटत असून, यंदा ती शून्यावर आल्याचा मुद्दा अर्थतज्ज्ञ अजित रानडे यांनी उपस्थित केला. यावर गोयल म्हणाले, ‘निव्वळ थेट परकीय गुंतवणूक घटत असल्याबाबत चिंता करण्याची गरज नाही. विदेशी गुंतवणूक भारतात येईल. कारण, भारत हा १४० कोटी लोकसंख्या आणि प्रचंड संधी असलेला देश आहे. म्हणूनच स्वित्झर्लंड, नॉर्वे आणि युरोपमधील काही देशांतील शंभराहून अधिक कंपन्या भारतात येत आहेत. इस्रायल, कतारमधूनही भारतात गुंतवणूक केली जात आहे. भारतीय उद्योगपती विदेशात गुंतवणूक करीत असून, ब्रिटनमध्ये भारतीयांची सर्वाधिक गुंतवणूक आहे. त्यांच्या अर्थव्यवस्थेत भारतीय गुंतवणुकीचा मोठा वाटा आहे.’

‘ही परिषद आता पूर्वेकडील ‘दावोस’ बनत आहे. भारतात मोठ्या प्रमाणात गुणवत्ता आणि तरुण लोकसंख्या आहे. यामुळे भारत हा गुंतवणुकीसाठी जगातील आघाडीचे केंद्र बनला आहे. तंत्रज्ञानातील नवनवीन बदलांमुळे जग अभूतपूर्व वेगाने बदल आहे. कृत्रिम प्रज्ञा हे केवळ आता उदयोन्मुख तंत्रज्ञान नसून, ते जागतिक अर्थव्यवस्था, उद्योग आणि राष्ट्रीय सुरक्षेत स्थित्यंतर घडवत आहे,’ असे डॉ. माशेलकर म्हणाले.

भारत आणि अमेरिका हे व्यापारात स्पर्धक देश नाही. या दोन्ही अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापारावरून तणाव आहे, हे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल. मुक्त व्यापार करार झाल्यास तो दोन्ही देशांसाठी लाभदायी ठरेल. -पीयूष गोयल, केंद्रीय वाणिज्य मंत्री

Story img Loader