Kasba Assembly Election Result Updates Ravindra Dhangekar Loss : विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं, तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. यामध्ये पुण्यातच नव्हे तर राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिलेले काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी रवींद्र धंगेकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे.
भाजपाने कसबा पेठ (Kasba Peth) मतदारसंघातील पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा या विधानसभा निवडणुकीत काढल्याची चर्चा यानंतर रंगली आहे. खरं तर पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला मानता जात होता. या मतदारसंघात भाजपाचं वर्चस्व राहिलेलं आहे. मात्र २०२३ मध्ये भाजपाच्या मुक्ता टिळत यांचं निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले होते.
हेही वाचा : Amol Khatal : आठ वेळा आमदार झालेल्या बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे अमोल खताळ कोण आहेत? जाणून घ्या!
दरम्यान, आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर हे काँग्रेसकडून निवडणुकीच्या मैदानात होते. तर त्यांच्या विरोधात महायुतीकडून हेमंत रासने हे निवडणुकीच्या मैदानात होते. पोटनिवडणुकीप्रमाणे या विधानसभेच्या निवडणुकीत देखील हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर हे आमने-सामने राहिल्याने ही निवडणूक अटीतटीची होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, कसब्यातून हेमंत रासने विजयी झाले आहेत तर रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा पराभव झाला.
हेमंत रासने कोण आहेत?
हेमंत रासने (Hemant Rasane) भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. तसेच पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी देखील हेमंत रासने यांनी याआधी काम केलेलं आहे. तसेच भाजपाच्या मुक्ता टिळत यांचं निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कसबा पेठ मतदारसंघातून भाजपाकडून हेमंत रासने यांनी निवडणूक लढवली होती. पण त्यात त्यांना पराभवाला समोरं जावं लागलं होतं. त्यानंतर आता २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत हेमंत रासने यांना भाजपाकडून पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती.
या निवडणुकीत हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी काँग्रेसचे रवींद्र धंगेकरांचा मोठ्या मताधिक्यांनी पराभव केला.दरम्यान, पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर हेमंत रासने यांनी पुन्हा एकदा लोकांशी संपर्क वाढवत काम सुरु ठेवले आणि लोकांचा विश्वास संपादन केला. तसेच मतदारसंघात पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देत आणि लोकांच्या केलेल्या कामांच्या कामाच्या जोरावर पुन्हा उमेदवारी मिळवत निवडणूक जिंकली.