लोकसत्ता वार्ताहर
बारामती : आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात राजकीय लढत होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. त्या अनुषंगाने अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव आणि युवा नेते जय पवार हे चार दिवसांच्या बारामती दौऱ्यावर आले आहेत.
अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेन्द्र पवार यांनी बुधवारी (२१ फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पक्ष कार्यालयाला सदिच्छा भेट दिली होती. या भेटीनंतर ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटाकडून आगामी होणाऱ्या निवडणुकीत प्रचार करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी गुरुवारी बारामती गाठली. कसबा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला जय पवार यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासमवेत पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आणखी वाचा-पुण्याला मुळशी धरणातून पाणी- अजित पवार यांचे आदेश
पवार कुटुंबातील आवडीच्या व्यक्तीसोबत प्रचारात सामील होत आहेत. मी सुद्धा यापूर्वी बारामती मतदारसंघातील प्रचारामध्ये सहभागी झालो होतो. पदयात्रा आणि रॅलीच्या माध्यमातून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या, असे जय पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.