पिंपरी पालिका शिक्षण मंडळाचे सभापती विजय लोखंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता नव्या सभापतिपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली असून सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. सभापती होण्यास काय निकष असणार, या विषयी उत्सुकता असून उपमुख्यमंत्री अजित पवार हेच अंतिम निर्णय घेणार आहेत.
शिक्षण मंडळ सदस्यपदासाठी नगरसेवकांऐवजी कार्यकर्त्यांना संधी देण्याचे धोरण अजितदादांनी ठेवले. त्यानुसार, मंडळाच्या सर्व जागांवर कार्यकर्ते बसले. स्वत:च्या अधिकारात अजितदादांनी पहिल्या वर्षी लोखंडे यांना संधी दिली. निर्धारित एक वर्षांच्या मुदतीपेक्षा तीन महिने जादा उपभोगलेल्या लोखंडे यांनी मंगळवारी राजीनामा दिला. येत्या १७ ऑक्टोबरला नव्या सभापती व उपसभापतिपदाची निवडणूक होत आहे. मंडळात राष्ट्रवादीचे निर्विवाद बहुमत असून सभापती होण्यास राष्ट्रवादीचे  जवळपास सर्वच सदस्य इच्छुक आहेत. फजल शेख, चेतन घुले, नाना शिवले, सविता खुळे, चेतन भुजबळ यांची नावे सध्या चर्चेत आहेत. आमदार विलास लांडे समर्थक धनंजय भालेकर व निवृत्ती शिंदे इच्छुक आहेत. मात्र, विजय लोखंडे हे लांडे समर्थक गटातील होते. त्यामुळे सलग दुसरी संधी भोसरी मतदारसंघाला मिळेल का, या साशंकतेने ते तूर्त मागणी करताना दिसत नाहीत. उपसभापतिपदासाठी शिरीष जाधव वगळता कोणी इच्छुक नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीकडे डझनावरी स्थानिक नेते आहेत. मात्र, कोणाही एका इच्छुकाला नेत्यांच्या शिफारशी मिळणार नाही. प्रत्येकाचे उमेदवार वेगळे असतील. त्यामुळे अंतिम निर्णय अजितदादा घेतील आणि तो सर्वाना मान्य करावा लागेल, अशी परिस्थिती आहे. सभापतिपदासाठी नेत्याचा, मतदारसंघाचा की जातीचा, यापैकी नेमका कोणता निकष लावण्यात येतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.