प्राध्यापकांनी परीक्षांच्या कामावर टाकलेला बहिष्कार हा आता शासन आणि प्राध्यापक संघटनेचा प्रतिष्ठेचा मुद्दा झाला असून परीक्षा वेळेवर घेण्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत ठरलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्याच्या शासनाच्या भूमिकेबाबत पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या प्राचार्याची कुलगुरूंनी सोमवारी बठक घेतली.
शासन आणि प्राध्यापक यांच्यामधील चर्चा सातत्याने फिसकटल्यानंतर आता प्राध्यापकांचा परीक्षांच्या कामकाजावरील बहिष्कार हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा झाल्याच पाहिजेत अशी भूमिका  घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा झाल्याच पाहिजेत अशा आशयाचे पत्र विद्यापीठांना पाठवून शासनाने हात झटकले आहेत. विद्यापीठानेही परीक्षांची प्रशासकीय तयारी पूर्ण करून परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच होतील अशी भूमिका विद्यापीठाने घेतली आहे. विद्यापीठाने परीक्षा घेण्याची जबाबदारी प्राचार्यावर सोपवली आहे. मात्र, महाविद्यालयातील प्राध्यापक कामच करणार नाहीत अशा परिस्थितीत परीक्षा निर्वघ्निपणे पार कशा पडायच्या अशी चिंता प्राचार्याना सतावत आहे. छोटय़ा महाविद्यालयांना हा प्रश्न जास्त भेडसावणार आहे. शासनाने पाठवलेल्या पत्रामुळे प्राचार्यासमोरही पर्याय राहिलेला नाही. बहिष्कारामध्ये सहभागी नसलेल्या प्राध्यापकांच्या सहकार्याने, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या सहकार्याने परीक्षा घेण्यात याव्यात अशा सूचना प्राचार्याना देण्यात आल्या आहेत, असे काही महाविद्यालयाच्या प्राचार्यानी सांगितले.
परीक्षा वेळेवरच होणार- कुलगुरू
परीक्षांच्या कामकाजाबाबत पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ वासुदेव गाडे यांनी सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्याची बठक घेतली. या बठकीसाठी दोनशेपेक्षा अधिक प्राचार्य उपस्थित होते. याबाबत डॉ गाडे म्हणाले, ‘‘विद्यापीठाच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच होणार आहेत. प्राचार्यानी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षा पार पाडण्यासाठी पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. काही प्राध्यापकही बहिष्कारातून बाहेर पडले असून त्यांनी काम सुरू केले आहे. याशिवाय शिक्षकेतर कर्मचारी कनिष्ठ महाविद्यालयांचे शिक्षक, बहिष्कारात सहभागी नसलेले प्राध्यापक यांच्या सहकार्याने परीक्षा होणार आहेत. परीक्षा घेण्यामध्ये महाविद्यालयाला कोणतीही अडचण आल्यास ती सोडवण्यासाठी विद्यापीठ सज्ज आहे. मात्र कुणाच्याही सांगण्यावरून अथवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले नाहीत तर ती त्यांची जबाबदारी असेल.’’