पुणे शहरात १ एप्रिलपासून लागू होत असलेल्या स्थानिक संस्था करातील तरतुदी व नियम अत्यंत क्लिष्ट असल्यामुळे व्यापाऱ्यांपुढे अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. त्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी २८ मार्चपासून शहरातील घाऊक बाजार बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय पुणे र्मचटस चेंबरच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
स्थानिक संस्था करातील (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) अनेक तरतुदी व नियम क्लिष्ट असून त्यांची अंमलबजावणी करणे व्यापारीवर्गाला फारच अडचणीचे ठरणार आहे. शहराबाहेरून पाच हजार रुपयांच्यावरील मालाची आयात करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकालाही एलबीटी भरावा लागणार आहे. एलबीटीबाबत अनेक अडचणी असून त्याकडे लक्ष वेधण्यासाठी सर्व घाऊक व्यापाऱ्यांनी २८ मार्चपासून बाजार बंद ठेवावा असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गुलटेकडी मार्केटयार्डसह पेठांमधील घाऊक व्यापार, तसेच मालाची चढ-उतार बंद राहील, असे चेंबरचे अध्यक्ष अजित सेटिया यांनी सांगितले.
विविध न्यायालयात जाणार
दरम्यान, चेंबरसह पुण्यातील आणखी तीन व्यापारी संघटना एलबीटीच्या विरोधात न्यायालयात जाणार असून त्यासाठीची आवश्यक प्रक्रिया सुरू असल्याचेही सेटिया यांनी सांगितले. पुणे जनहित आघाडीनेही एलबीटीला विरोध केला आहे. संघटनेचे अध्यक्ष उज्ज्वल केसकर यांनी एलबीटीच्या विरोधातील याचिका गुरुवारी उच्च न्यायालयाला सादर केली. पुणे महापालिका कामगार युनियननेही एलबीटीला विरोध केला असून महापालिकेत जकातच कायम राहिली पाहिजे या मुद्दय़ावर संघटना न्यायालयात जाणार असल्याचे मुक्ता मनोहर यांनी सांगितले. न्यायालयात जाण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याचे त्या म्हणाल्या.