पुणे : जागतिक पातळीवरील वाढती अनिश्चितता आणि घरांच्या किमतीत सातत्याने होत असलेली वाढ याचा फटका गृहनिर्माण बाजारपेठेला बसला आहे. यंदा जानेवारी ते मार्च तिमाहीत पुण्यात नवीन घरांच्या विक्रीला घरघर लागल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षातील याच तिमाहीच्या तुलनेत यंदा घरांच्या विक्रीत तब्बल ३० टक्के घट नोंदविण्यात आली आहे. याच वेळी नवीन घरांचा पुरवठाही कमी झाला आहे.

‘अनारॉक ग्रुप’ने देशातील मालमत्ता क्षेत्राचा जानेवारी ते मार्च तिमाहीचा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार, पुण्यात यंदा पहिल्या तिमाहीत एकूण १६ हजार ५०० नवीन घरांची विक्री झाली. ही विक्री गेल्या वर्षी याच तिमाहीत २२ हजार ९९० होती. त्यात यंदा ३० टक्के घसरण झाली आहे. याचवेळी पुण्यातील नवीन घरांचा पुरवठा पहिल्या तिमाहीत १६ हजार ८६० आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो १८ हजार ७७० होता. त्यात यंदा १० टक्के घट झाली आहे. विशेष म्हणजे, मध्यम व आलिशान घरांच्या (किंमत ४० लाख ते १.५ कोटी रुपये) पुरवठ्यात तब्बल ७९ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.

देशातील घरांच्या एकूण विक्रीत मुंबई आणि पुण्याचा एकत्रित वाटा ५१ टक्के आहे. मुंबईत यंदा पहिल्या तिमाहीत ३१ हजार ६१० नवीन घरांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत घरांची विक्री ४२ हजार ९२० होती. त्या तुलनेत यंदा विक्रीत २६ टक्के घट झाली आहे. याच वेळी मुंबईत नवीन घरांचा पुरवठा पहिल्या तिमाहीत ३० हजार ७५५ आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ९ टक्के घसरण झाली आहे. त्यात ८० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांचा पुरवठा निम्म्याहून अधिक कमी झाला आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

नेमकी कारणे काय?

गेल्या काही वर्षांपासून देशातील गृहनिर्माण क्षेत्रात तेजीचे वारे होते. यामुळे घरांच्या किमतीत सातत्याने वाढ सुरू आहे. याचा परिणाम गेल्या काही महिन्यांपासून घरांच्या विक्रीवर होताना दिसून येत आहे. यातच जागतिक पातळीवर भूराजकीय तणावात वाढ होत आहे. यामुळे जागतिक पातळीवर अनिश्चिततेचे वारे आहे. याचा फटका माहिती तंत्रज्ञानसह (आयटी) अनेक क्षेत्रांना बसत आहे. यामुळे या क्षेत्रातील कार्यरत असलेल्या वर्गाने घर खरेदीसाठी हात आखडता घेतला आहे, असा सूर गृहनिर्माण क्षेत्रातून उमटत आहे.

जागतिक पातळीवर अनिश्चिततेचे वारे आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ मंदावली आहे. याचाच परिणाम देशातील गृहनिर्माण बाजारपेठेवर होत आहे. त्यातच घरांच्या किमती वाढल्याचा परिणाम होऊनही मागणी कमी झाली आहे. -अनुज पुरी, अध्यक्ष, अनारॉक ग्रुप