पुणे : श्रावणापासून गौरी, गणपतीच्या सण-उत्सवाच्या काळात दर वर्षी विड्याच्या पानाच्या दरात तेजी असते. पण, यंदा अतिपावसामुळे उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. आवक कमी आणि मागणी जास्त, अशा स्थितीमुळे एका करंडीचा (तीन हजार पाने) दर १४०० ते १५०० रुपयांवर गेला आहे. दरातील तेजी दिवाळीपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे.
दर वर्षी श्रावण महिन्यापासून विड्याच्या पानांची दरवाढ सुरू होते. गौरी, गणपतीत दरात आणखी वाढ होते, ती दसऱ्यापर्यंत कायम असते. पितृ पंधरवड्यात दर उतरतात आणि दिवाळीत पुन्हा वाढतात. यंदा श्रावणापासून पानांची दरवाढ सुरू झाली. गौरी – गणपतीत त्यात मोठी वाढ झाली आहे.
पूजेसाठी आणि खाण्यासाठी मिरज तालुक्यासह महाराष्ट्र – कर्नाटकच्या सीमेवरून विड्याच्या पानांची आवक होते. पण, नेमक्या याच भागात जुलै-ऑगस्टमध्ये दमदार पाऊस झाला आहे. प्रामुख्याने सांगलीत सरासरीपेक्षा सुमारे ६४ टक्के (६४० मिमी) जास्त पाऊस पडला आहे. अतिवृष्टी, संततधार यामुळे पानमळ्यांत पाणी साचून राहिल्यामुळे विड्याच्या पानाच्या वेलीची मुळे कुजू लागली आहेत. वेली पिवळ्या पडू लागल्या आहेत. पानेही सडू लागली आहेत. त्यामुळे पानांची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे, अशी माहिती मिरज (नरवाड ) येथील पानउत्पादक प्रभाकर नागरगोजे यांनी दिली.
हेही वाचा – साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची राज ठाकरे यांच्याकडून होणार निवड
सण-उत्सवाच्या काळात पानाच्या एका करंडीला (तीन हजार पाने) सरासरी १००० ते १२०० रुपयांवर दर असायचा. यंदा तो १४०० ते १५०० रुपयांवर गेला आहे. मुळात पानांची आवकच कमी असल्यामुळे आणि वेलींचे नुकसान झाल्यामुळे नजीकच्या भविष्यात पानांची आवक फार वाढेल, असे दिसत नाही. त्यामुळे पितृ पंधरवड्यात दरात घट होण्याची चिन्हे नाहीत. दिवाळीपर्यंत विड्यांच्या पानांची दरवाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.
दरवाढ दिवाळीपर्यंत राहण्याचा अंदाज
अतिवृष्टी, संततधार यामुळे विड्याच्या पानाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. वेलींचे नुकसान झाल्यामुळे पाऊस कमी झाल्यावर लगेच पानांच्या उत्पादनात वाढीची शक्यता नाही. आवक कमी आणि मागणी जास्त, अशा स्थितीमुळे पानांची दरवाढ दिवाळीपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. कलकत्ता, बनारस पानांची आवक आणि दर स्थिर आहेत, अशी माहिती पानाचे घाऊक विक्रेते नीलेश खटाटे यांनी दिली.
© The Indian Express (P) Ltd