पिंपरी चिंचवड : बहिणींनो मी तुमचा भाऊ आहे. तुम्ही सावत्र भावापासून सावध राहा. ते लाडकी बहीण योजनेबद्दल अनेक प्रश्न निर्माण करत आहेत. खोटं सांगत आहेत. असं म्हणत अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. अजित पवार हे पिंपरीतील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी पिंपरी- चिंचवड शहरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनेक पदाधिकारी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. तसेच पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभेबाबत देखील अजित पवार यांनी वक्तव्य केल आहे.
अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्राच्या महिलांनी मला पाच वेळा उपमुख्यमंत्री केलं. उपमुख्यमंत्री व्हायचं रेकॉर्ड झालं, ते कोणीही तोडू शकणार नाही. हे केवळ महिलांमुळे शक्य झालं आहे. सरकारने लाडकी बहीण योजना काढल्यानंतर विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं आहे. विरोधक चुनावी जुमला म्हणत आहेत. मी अनेक सभा, निवडणुका केल्या आहेत. परंतु, लाडकी बहीण या योजनेमुळे मला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये आमचं सरकार आल्यास ही योजना पुढे सुरू ठेवणार आहोत. पुढील पाच वर्षात महिलांच्या बँक खात्यात ९० हजार रुपये जमा होतील.”
ते पुढे म्हणाले, “पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे हे चांगलं काम करत आहेत. आगामी काळात अधिक चांगलं काम करण्यासाठी महायुतीचे जास्तीत- जास्त आमदार निवडून द्यायचे आहेत. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभेत कोण उमेदवार असणार हे आम्ही सर्वजण एकत्र बसून ठरवू. मात्र, मतदारसंघातील नागरिकांच्या आणि महायुतीच्या मनात जो उमेदवार असेल त्यालाच उमेदवारी मिळणार.” असं अजित पवारांनी ठणकावून सांगितलं.
महिला रिक्षा चालक असलेल्या रिक्षातून अजित पवारांचा प्रवास
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन- सन्मान यात्रा आज पिंपरी विधानसभा मतदारसंघात दाखल झाली. पिंपरी- चिंचवड शहरातील भक्ती- शक्ती ते एच ए मैदान पिंपरी अशी ही जन सन्मान यात्रा निघाली. दरम्यान, या यात्रेच्या सुरुवातीलाच काही रिक्षा चालक महिलांनी अजित पवारांकडे आपल्या रिक्षामधून प्रवास करायचा हट्ट धरला आणि दादांनी तो पिंक रिक्षामध्ये प्रवास करून महिलांचा हट्ट पूर्ण केला.