लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : राजकारणात कौटुंबीक नाते आणणे दुर्दैवी आहे. निवडणूक म्हटली की आरोप-प्रत्यारोप होतच राहणार. मात्र, निवडणूक काळ तेवढ्यापुरता असतो. निवडणुकीनंतर नात्यांमध्ये सुधारणा होईल, असा विश्वास महायुतीच्या बारामती मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी व्यक्त केला.
प्रचारानिमित्त खडकवासला मतदारसंघात आलेल्या सुनेत्रा पवार यांनी पुण्याचे माजी खासदार प्रदीप रावत यांनी भेट घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘निवडणूक म्हटली, की आरोप-प्रत्यारोप होतच असतात. निवडणूक काळानंतर नात्यांमध्ये नक्कीच सुधारणा होतील. बारामती मतदारसंघात सर्व तालुक्यांत फिरले आहे, सर्वच तालुक्यांत चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे चांगले मताधिक्य मिळेल, असा विश्वास आहे. भोरमध्ये एमआयडीसीचा प्रश्न आहे, पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे प्रत्येक तालुक्याचे म्हणून काही प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत, ते सोडविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन. मला समाजकारणाचा अनुभव आहे. बारामती तालुक्यात विकासाचा एक पॅटर्न तयार केला आहे. हाच पॅटर्न बारामती लोकसभा मतदारसंघात घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.’
आणखी वाचा-पुणे : निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर; पाच हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती
दरम्यान, मतदारांची भाषा मी जाणते आणि त्यांचे प्रश्न संसदेत गेल्यावर नक्कीच मांडेन. गेल्या २५ वर्षांपासून मी समाजकारणात आहे. बारामती तालुक्यातच कार्यरत असल्याने इतर ठिकाणी कामाची फारशी माहिती नव्हती. बारामती टेक्स्टाईल पार्कची मी अध्यक्ष असून तेथे साडेतीन हजार महिला काम करतात, काटेवाडी ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत गेली अनेक वर्षे काम करत आहे. एन्व्हायर्नमेंटल फोरम या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरणाशी संबंधित संस्था आहे. त्यामुळे जनतेमधूनच माझ्या उमेदवारीची मागणी होत होती, त्यामुळे जनतेनेच बारामतीची निवडणूक हाती घेतली आहे. बारामती हेच माझे कुटुंब आहे. महिला सक्षमीकरण, शेतकरी, युवकांना रोजगार या तीन मुद्द्यांवर खासदार म्हणून काम करेन, असेही सुनेत्रा पवार यांनी या वेळी सांगितले.