पुणे : देशात एम.फिल. (मास्टर्स ऑफ फिलॉसॉफी) पदवीला मान्यता नसल्याचे नमूद करत विद्यापीठांनी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी या अभ्यासक्रमाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) दिले. युजीसीच्या आदेशामुळे आतापर्यंत प्रवेश प्रक्रिया राबवलेल्या विद्यापीठांसमोर मोठी अडचण निर्माण होणार आहे.
हेही वाचा – पुणे : विमाननगर हादरले; एकापाठोपाठ दहा सिलिंडरचे स्फोट
युजीसीने या संदर्भातील परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले. काही विद्यापीठे एम.फिल. अभ्यासक्रमासाठी नवे अर्ज मागवत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र एम.फिल. या पदवीला देशात मान्यता नाही. युजीसी (किमान मानके आणि पीएच.डी. देण्यासाठीची प्रक्रिया) अधिनियम २०२२ तील नियम १४ मध्ये उच्च शिक्षण संस्थांनी एम.फिल. अभ्यासक्रम न राबवण्याबाबत स्पष्टपणे नमूद केलेले आहे. युजीसी अधिनियम २०२२ बाबतचे राजपत्रही प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी एम. फिल. अभ्यासक्रमाचे प्रवेश तातडीने थांबवावे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांनीही एम.फिल. अभ्यासक्रमाला प्रवेश न घेण्याचे आवाहन युजीसीकडून करण्यात आले आहे.