मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार निवडून येतात. मग, खासदारकीच्या निवडणुकीत नेमके काय होते, आपले उमेदवार का पराभूत होतात, असा मुद्दा उपस्थित करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले. एकोपा राखा आणि केंद्रात शरद पवार यांचे हात बळकट करा, असे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रवादीच्या कामशेतला झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. खासदार वंदना चव्हाण, आमदार दिलीप मोहिते, अशोक पवार, पिंपरीच्या महापौर मोहिनी लांडे यांच्यासह वसंत वाणी, आझम पानसरे, कृष्णराव भेगडे, माऊली दाभाडे, मदन बाफना, बबनराव भेगडे, बाळासाहेब नेवाळे, योगेश बहल आदींसह मावळ-शिरूरचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले, संघटनेला महत्त्व द्या, खिरापतीसारखी पदे वाटू नका, गुन्हेगारांना थारा देऊ नका, तालुकाध्यक्षांना विश्वासात घ्या, अंतर्गत भांडणामुळे पक्षाला किंमत मोजावी लागली आहे, हे लक्षात ठेवून एकोपा ठेवा. लोणावळा-तळेगावमध्ये एकोपा झाल्यास ‘मावळ’ मध्ये नक्कीच यश मिळेल. चाकण विमानतळाचा फायदा पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर येथील नागरिकांना होणार आहे. त्यामुळे विमानतळाला अकारण विरोध करू नका. स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याची आपली तयारी आहे. तेथे शेतकऱ्यांचा विरोध नसून स्थानिक खासदारांचा विरोध आहे. ऊस आंदोलनाचा संदर्भ देत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही नेते शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याची टीका त्यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा