भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पिंपरी-चिंचवड येथे माध्यमांशी बोलताना आर्यन खान, जरंडेश्वर साखर कारखाना, आगामी महापालिका निवडणुक यावरील प्रश्नांवर उत्तर देताना, महाविकासआघाडी सरकार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
“मला एक सामान्य नागरिक म्हणून प्रश्न पडला आहे की, एवढा यांना शाहरूख खानच्या मुलाचा पुळका का आला? म्हणजे नवाब मलिक रोज काहीतरी त्यावर म्हणणार, मग महाराष्ट्र सरकार आता काय सर्वोच्च न्यायालयात जाणार. महाराष्ट्रात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यात महाराष्ट्र सरकार तत्परता दाखवत नाही. शाहरुख खानच्या मुलाला जामीन मिळत नाही, एक बर झालं हायकोर्टावर यांचा संशय नाही. अन्यथा ते म्हणाले असते हायकोर्ट देखील यांनी मॅनेज केलं. पाळंमुळं काढण्यासाठी हायकोर्ट जामीन देत नसेल, तर एवढं तडफडण्याचं काम नाही. हे सर्व बरोबर नाही.” असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील म्हणाले.
६४ कारखान्यांचा विषय वेगळा आहे, कारण… –
तसेच, अजित पवारांच्या विधानाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, “६४ कारखाने विकले गेले आहेत तर त्याची चौकशी करा, आम्ही कोणाला अडवलं नाही. जरंडेश्वरचा विषय वेगळं आहे. हा कारखाना ईडीच्या चौकशीच्या अंतर्गत आहे. ईडी चौकशी कोणाची करते? जिथे मनी लॉड्रींग होते. अशी प्रकरणं असलेल्यांची चौकशी करा. ६४ कारखान्यांचा विषय वेगळा आहे. ते कमी किंमतीत विकले गेलेत. ते कमी किंमतीत का विकले गेले? याची चौकशी राज्य सहकारी बँकेची चौकशी केली पाहिजे. त्याचे डायरेक्ट म्हणून अजित पवार यांची देखील चौकशी केली पाहिजे. मनी लॉड्रींग म्हणजे तुम्हाला मिळालेली कॅश ही तुम्ही व्हाईटमध्ये कन्व्हर्ट करणे, फेक कंपन्यांच्या माध्यमातून तुमच्या कारखान्यात आणणं. जरंडेश्वरचा कारखाना हा त्या गटात आहे.” असं सांगितलं.
मनसे सोबत युतीची शक्यता नाही –
याचबरोबर, “मनसे सोबत युतीची शक्यता नाही. हे अनेकदा म्हटलंय. त्यांची परप्रांतीयांची भूमिका आहे ती संघाला आणि भारतीय जनता पक्षाला मान्य नाही. संघाच्या विचारधारेच्या विरोधात जाऊ शकत नाहीत.” असंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. तर, “आमचे आमदार, नगरसेवक कसे नीट राहतील यासाठी आम्ही समर्थ आहोत. शरद पवारांवर महानगर पालिकेच्या निवडणुकांमध्ये लक्ष देण्याची वेळ आली. अजित पवार, अमोल कोल्हे हे लक्ष घालत आहेत याचा अर्थ असा की आम्हाला हरवणं सोपं नाही. ” असंही त्यांनी बोलून दाखवलं.