पुणे : पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रासाठी कार्यालय व औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रांसाठी जागा भाडेतत्त्वाने घेण्यात यंदाचे वर्ष विक्रमी ठरण्याचा अंदाज मालमत्ता क्षेत्रातील सल्लागार संस्था सीबीआरई इंडियाने वर्तविला आहे. पुण्यातील कार्यालयीन जागा भाडेतत्त्वावर घेण्याचे व्यवहार चालू वर्षात ७० लाख चौरस फुटांवर जाण्याची शक्यता असून, हा गेल्या सहा वर्षांतील उच्चांक ठरेल, असेही नमूद करण्यात आले आहे.
सीबीआरई इंडियाच्या अहवालानुसार, पुण्यातील भाडेतत्त्वावरील कार्यालयांचे क्षेत्र २०२४ मध्ये ७० लाख चौरस फुटांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. सध्या पुणे ही भारतातील सहावी सर्वांत मोठी कार्यालयीन बाजारपेठ आहे. गेल्या वर्षी पुण्यात भाडेतत्त्वावरील कार्यालयीन जागांचे क्षेत्र ६३ लाख चौरस फूट होते. विशेषतः शहराच्या औंध, बाणेर व विमाननगर अशा परिसरात कार्यालयीन जागांना अधिक मागणी आहे. या प्रत्येक परिसरात प्रत्येकी सुमारे १५ लाख चौरस फूट भाडेतत्त्वावरील कार्यालयांच्या जागा आहेत. प्रेस्टिज व सलारपुरिया यांसारख्या कंपन्या आणि मॅपल ट्रीसारख्या गुंतवणूकदार संस्थांनी या बाजारपेठेत प्रवेश केल्याने तिचा अधिक विस्तार होत आहे.
हेही वाचा >>>भोसरी भूखंड घोटाळ्यात एकनाथ खडसे यांच्यासह पत्नी आणि जावयाला जामीन मंजूर
पुण्यातील तंत्रकुशल मनुष्यबळ आणि स्पर्धात्मक बांधकाम क्षेत्र बाजारपेठ हे प्रमुख घटक माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांसाठी फायद्याचे ठरले आहेत. यामुळे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, विप्रो व ॲक्सेंच्युअर अशा कंपन्यांनी पुण्यात कार्यालये स्थापन केली. या मोठ्या कंपन्यांच्या उपस्थितीमुळे पुण्यातील मालमत्ता क्षेत्राच्या वाढीला गती मिळत आहे. सातत्यपूर्ण पायाभूत विकास प्रकल्पांमुळेही या क्षेत्राला बळकटी मिळत आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भाडेतत्त्वावरील कार्यालयीन जागांची मागणी स्थिर राहण्याचा, तर दुसऱ्या सहामाहीत त्यात तेजी येण्याचा अंदाज आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
पुण्यातील कार्यालयीन जागा (दशलक्ष चौरस फुटांमध्ये)
वर्ष – मागणी – पुरवठा
२०१९ – ६.९ – ५.०
२०२० – ३.५ – ३.७
२०२१ – ३.३ – ६.०
२०२२ – ५.६ – ४.३
२०२३ – ६.३ – ५.३
२०२४ (अंदाजे) – ७.० – ६.३
पुणे शहर हे मोक्याच्या ठिकाणी असल्याने त्याचे अनेक फायदे आहेत. त्याचबरोबर शहरातील उत्तम पायाभूत सुविधा या व्यवसायांसाठी पूरक ठरत आहेत. याचबरोबर कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे कंपन्या पुण्यात कार्यालये स्थापन करीत आहेत. कार्यालयीन जागांमध्ये को-वर्किंग स्पेसचे प्रमाण वाढले असून, भविष्यात त्यात आणखी वाढ अपेक्षित आहे.- अंशुमन मॅक्झिन, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, सीबीआरई इंडिया