पुणे : घरातील मत्स्यालयात ठेवल्या जाणाऱ्या सकर या शोभिवंत माशाला नदी, तलावात सोडल्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. सकर मासा अन्य माशांची अंडी, पिले खात असल्याने नदी, तलावातील अन्य माशांचा अधिवासच धोक्यात आला असून, प्रदूषित पाण्यातही सकर मासा तग धरत असल्याचे समोर आले आहे.
चेक युनिव्हर्सिटी ऑफ लाइफ सायन्सेस प्राग आणि पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयातील संशोधक चांदनी वर्मा, मनोज पिसे, तुषार खरे, प्रदीप कुमकर आणि लुकाश कालोस यांच्या चमूने सकर माशासंदर्भात संशोधन केले. या संशोधनाचा शोधनिबंध ‘जर्नल ऑफ व्हर्टिब्रेट बायोलॉजी’मध्ये प्रकाशित झाला आहे. या संशोधनातून महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये, तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकमध्ये सकर माशाचे अस्तित्त्व आढळून आले. सकर माशाच्या संशोधनासाठी आय इकॉलॉजी या तंत्राचा उपयोग करण्यात आला. त्यात इंटरनेट, समाजमाध्यमांत असलेली छायाचित्रे, चित्रफिती वापरून मॅपिंग करण्यात आले. तसेच काही ठिकाणी प्रत्यक्ष नमूने घेऊन अभ्यास करण्यात आला. संशोधनाबाबत कुमकर यांनी ‘लोकसत्ता’ला माहिती दिली.
हेही वाचा – राज्यात अपंगांच्या सर्वेक्षणाला तीस वर्षांनंतर मिळाला मुहूर्त
सकर मासा इंडोनेशिया, बांगलादेशमध्ये आढळत असल्याबाबत या पूर्वी संशोधन झाले आहे. मात्र भारतात असा अभ्यास झाला नव्हता. सकर मासा काच स्वच्छ करतो असे मानले जात असल्याने त्याला घरातल्या मत्स्यालयात ठेवण्यास पसंती दिली जाते. मात्र, हा मासा झटपट मोठा होतो. त्यामुळे तो मोठा झाल्यावर त्याला नदी, तलावात सोडून दिले जाते. हा मासा नदी, तलावातील अन्य माशांची पिले, अंडी, शेवाळ खात असल्याने तेथील अधिवासच धोक्यात आला आहे.
सकर माशाच्या खवल्यांच्या जागी हाडांचे आवरण असल्याने नदी, तलावातील माशांनी त्याच्यावर हल्ला केला, तरी त्याला इजा होत नाही. हा मासा पाण्याबाहेर दोन ते चार तास जगतो. पुण्याजवळील भिगवण ते संगमवाडी येथेही त्याचे अस्तित्व आढळले आहे. त्यामुळे तो प्रदूषित पाण्यातही टिकाव धरू शकत असल्याचे दिसून येते. सकर मासा खाण्यायोग्य आहे का, याचा अभ्यास झालेला नाही. मात्र अद्याप तो भारतात खाण्यासाठी वापरला जात नाही, असे कुमकर यांनी सांगितले.
परदेशी मासे नदी, तलावात सोडणे धोकादायक
घरगुती मत्स्यालयातील कोणताही परदेशी मासा नदी, तलावात सोडणे योग्य नाही. त्यामुळे स्थानिक मासे, अधिवासाला धोका निर्माण होतो. तसेच परदेशी माशांमुळे आजार पसरण्याचाही धोका आहे, याकडे कुमकर यांनी लक्ष वेधले.