लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : वढु बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ विकास आणि तुळापूर येथील बलिदान स्थळ विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, हा कार्यक्रम अर्धवट टाकून स्थानिक खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि शिरूरचे आमदार अशोक पवार हे बाहेर पडले.
बारामती येथील नमो महारोजगार मेळावा पार पडल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ विकास भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे तुळापूर येथे आले. या कार्यक्रमात डॉ. कोल्हे आणि आमदार पवार यांना स्थानिक लोकप्रतिनिधी असताना देखील व्यासपीठावर दुसऱ्या रांगेत बसविण्यात आले होते. तसेच कार्यक्रमाचे श्रेयही या दोघांना देण्यात आले नसल्याचे लक्षात आल्यानंतर ते कार्यक्रम अर्धवट टाकून बाहेर पडले.
आणखी वाचा-उष्णतेच्या लाटांसह यंदाचा उन्हाळा कडक; तीन महिन्यांसाठी हवामान विभागाचा अंदाज काय?
‘शंभूभक्त म्हणून समाधीस्थळाच्या जीर्णोद्धार कार्यक्रमाचे मी स्वागतच केले आहे आणि अजित पवार यांचे आभारही मानले आहेत. मात्र, हा कार्यक्रम राजकीयदृष्ट्या ‘हायजॅक’ करण्यात आला. तुळापूरकडे येताना राजकीय नेत्यांचेच फलक रस्त्यांवर लावण्यात आले होते. फलकांवर संभाजी महाराजांचा फोटो नव्हता. तसेच कोनशिलेवर स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून माझे आणि आमदार अशोक पवार यांचे नाव नाही. आम्ही दोघांनी समाधीस्थळाचा विकास होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. त्याला यश आले आहे. निधी दिला म्हणजेच विकास होतो, असा कार्यक्रमाच्या आयोजकांचा समज असावा. निधी दिल्यानंतर इमारत उभी होते. स्मारकाची प्रेरणा जिवंत चैतन्यात असते. व्यासपीठावर दुसऱ्या रांगेत बसविण्यात आले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्मारकाचे उद्घाटन केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचे आभार मानतो.
आणखी वाचा-पुणे : सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे एटीएममधून रोकड चोरणारा गजाआड
अजित पवार हे साडेतेरा वर्षे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. सलग १५ वर्षे तत्कालीन खासदार यांच्या काळात छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार का झाला नाही?. नगर जिल्ह्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील नाट्याचा प्रयोग होता. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची परवानगी घेऊनच मी कार्यक्रमातून बाहेर पडलो’, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.