मुस्लीम मतांचा वापर करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत आले. मात्र, मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा येताच त्याच्यावर भाष्य करायला तयार नाहीत. ही त्यांची दुटप्पी भूमिका असल्याची टीका खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. ते, पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन आज औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे तिरंगा मोर्चा घेऊन मुंबईत दाखल होत आहेत. त्या अगोदर त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरात त्यांच्याशी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
खासदार जलील म्हणाले की, हा मोर्चा २७ नोव्हेंबर रोजी होणार होता. मात्र, करोनाचे कारण देऊन प्रशासनाने परवानगी नाकारली. अन्यथा या पेक्षा मोठा वाहनांचा ताफा असता. २०१४ पासून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष हा मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याची मागणी भाजपाकडे करत होते. तेव्हा, भाजपा सत्तेत होती. मग, आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेत आहेत. त्यांनी मुस्लीम समाजाला आरक्षण द्यायला हवं. पण ते यावर बोलायला तयार नाहीत. ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे अशी टीका त्यांनी केली आहे. मुस्लीम समाजाच्या मतांवर राष्ट्रवादी किंवा काँग्रेस निवडून येतात. मुस्लीम समाज हा केवळ निवडणुकीपूरता ठेवायचा आहे का? असा प्रश्न खासदार जलील यांनी उपस्थित केला आहे. आम्ही मुंबईला तिरंगा मोर्चा घेऊन जात असून मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावं हा आमचा मुद्दा आहे अस त्यांनी यावेळी नमूद केलं.