देश एकसंध ठेवण्याच्या दृष्टीने देशसेवा करणाऱ्यांना पद्म पुरस्काराने का सन्मानित केले जात नाही, असा प्रश्न राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केला. देशसेवेचे काम पद्म पुरस्कारापेक्षाही मोठे आहे, असेही ते म्हणाले.
‘सरहद’ संस्थेच्या वतीने देण्यात येणारा अकरावा संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार पंजाबातील कम्युनिस्ट कार्यकर्ते व दहशतवादविरोधी लढय़ातील अग्रणी जतींदर पन्नु यांना पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. माजी पोलीस महासंचालक एस. एस. विर्क, पंजाबातील धुमानचे सरपंच सरदार हरबन्ससिंग, पंडोरीचे सरपंच सरदार भजनसिंग, ‘सरहद’चे संस्थापक संजय नहार, पुरस्कार समितीचे संतसिंग मोखा आदी या वेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, की भारतामध्ये अनेक भाषा व जाती आहेत. मात्र तरीही देश एकसंध आहे. ही एकसंधता राजकारण्यांनी अनेकदा बिघडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, देशसेवा करणाऱ्या लोकांमुळे ही एकसंधता टिकून राहिली. आज क्षुल्लक कारणावरून जाती-धर्मामध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. हा प्रयत्न देशाचे हित करीत नाही. दंगली होतात, पण पोलिसांची गोळी नेत्याला लागत नाही. पुढाऱ्यांचे बंगले जळत नाही. गरिबांच्या झोपडपट्टय़ाच जळतात, त्यांचीच मुले मारली जातात. गरीब गेले तरी चालतील, पण त्यावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होतो. अशा काळात देशसेवकांची गरज आहे.
पुरस्काराला उत्तर देताना पन्नू म्हणाले, की देशातील एकता टिकविण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यामुळे छोटय़ा-छोटय़ा गोष्टींवरून होणारे वाद आता थांबले पाहिजेत.

Story img Loader